Join us

पाण्याअभावी आठ हजार एकर क्षेत्रातील द्राक्ष बागांची एप्रिल छाटणी थांबली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 11:19 AM

पाण्याअभावी दक्षिण सोलापूर तालुक्यातील ८ हजार एकर क्षेत्रावरील द्राक्ष बागांची छाटणी खोळबली असून यंदा द्राक्ष बागायत दारावर मोठे आर्थिक संकट कोसळण्याची चिन्हे दिसत आहेत. द्राक्ष उत्पादक शेतकरी या परिस्थितीने हवालदिल झाले आहेत.

पाण्याअभावी दक्षिण सोलापूर तालुक्यातील ८ हजार एकर क्षेत्रावरील द्राक्ष बागांची छाटणी खोळबली असून यंदा द्राक्ष बागायत दारावर मोठे आर्थिक संकट कोसळण्याची चिन्हे दिसत आहेत. द्राक्ष उत्पादक शेतकरी या परिस्थितीने हवालदिल झाले आहेत.

द्राक्ष उत्पादनामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव, बोरामणी, मुस्ती, शिरपणहळळी, उळे, वडजी यासह निम्बर्गी, लवंगी, सादेपूर ही गावे अग्रेसर असतात. विशेषतः बोरामणी परिसरात पाण्याची प्रतिकूल परिस्थिती असतानाही द्राक्ष बागा फुलवण्याचे कसब येथील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते.

संकटावर मात करत शेतकरी द्राक्ष बागांचे जतन करतात. यंदा निसर्गाच्या अवकृपेने द्राक्ष उत्पादक हतबल झाले आहेत. गतवर्षी कमी पाऊस झाल्याने पाण्याची पातळी खोलवर गेली आणि द्राक्ष उत्पादकांची परवड सुरू झाली आहे. दरवर्षी द्राक्ष उत्पादक १५ एप्रिलच्या दरम्यान द्राक्षांची छाटणी करतात. वेळेवर छाटणी झाली तरच द्राक्ष वेलीमध्ये काडी तयार होते.

ही काडी तयार झाली तर ऑक्टोबर छाटणीनंतर द्राक्षांचे घड तयार होतात. वेळेत छाटणी झाली नाही तर द्राक्ष घड तयार होण्याऐवजी बागा वांज होण्याची भीती असते. यंदा हे दुष्टचक्र दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नशिबी आले आहे. सादेपूर, लवंगी, भंडारकवठे या गावांना काही प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याने छाटण्या होऊ शकल्या.

खर्चाचा भुर्दंडखर्चाच्या दृष्टीने द्राक्ष पीक सर्वात महागडे आहे. सर्व प्रकारची नैसर्गिक स्थिती उत्तम असेल तर द्राक्ष उत्पादक शेतकरी बागा फुलवण्यासाठी मोठा खर्च करतात. एकरी किमान तीन लाखापर्यंत खर्च होतो. निसर्गाची अवकृपा झाल्यास केलेला संपूर्ण खर्च वाया जातो. गेल्या काही वर्षांत अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, दुष्काळी स्थिती, रोगराई यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणींचा सामना करीत आहेत. निसर्ग कोपला तर खर्चाचा भुर्दंड नको, अशी मनस्थिती झाल्याने शेतकरी द्राक्ष बागाकडे हातबलतेने पाहत आहेत.

विहिरी, बोअर कोरडेबहुतांशी द्राक्ष बागा विहिरी आणि बोअरवर अवलंबून आहेत. मागील वर्षी पावसाने दगा दिला. त्यामुळे पाणी पातळी खोलवर गेली आहे. विहिरी कोरड्या पडल्या, बोअर चे पाणी तर जानेवारीअखेर संपले. काही शेतकऱ्यांनी टँकरच्या मदतीने द्राक्ष बागा जगवल्या. दाक्षांचा हंगाम संपल्यानंतर आता या दाहक स्थितीला तोंड देण्याची शेतकऱ्यांना हिंमत होत नाही.

दुष्काळी मदतीपासून वंचितमागील वर्षी कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील काही तालुके दुष्काळी जाहीर करण्यात आले. यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्याचा समावेश करण्यात आला नाही. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. दुष्काळी मदतीचा लाभ मिळत नाही. ही खंत द्राक्ष उत्पादकांना अधिक सतावत आहे. आर्थिक मदत मिळाली असती तर टँकरने पाणी अथवा बोअर खोदणे यासाठी आधार मिळू शकला असता अशी शेतकऱ्यांची भावना आहे.

शासनाने दक्षिण सोलापूर तालुक्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. अत्यल्प पाऊस झाला असला तरी दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश नाही. त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत. - गंगाधर बिराजदार, निम्बर्गी, द्राक्ष उत्पादक शेतकरी

अधिक वाचा: विहिरीला पाणी कमी पडू नये म्हणून करा हा सोपा उपाय

टॅग्स :द्राक्षेशेतकरीशेतीफलोत्पादनसोलापूरफळेपाऊसदुष्काळपाणी