Join us

कृषी सेवा केंद्र चालकांची मनमानी; युरिया मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत

By रविंद्र जाधव | Published: June 26, 2024 1:36 PM

कृषी विभाग म्हणतंय साठा भरपूर तरीही शेतकर्‍यांना युरिया मिळेना...

यंदा मृग नक्षत्राने वेळेवर हजेरी लावल्यामुळे खरिपाच्या पेरण्या वेळेवर झाल्या आहे. ज्यामुळे सध्या कपाशी, मका, भुईमूग, मूग, सोयाबीन, तूर, उडीद, अशी यंदाच्या खरिपातील पिके मशागतीस आली असून पिकांना खत देतांना, पिकांतील तणनियंत्रण करतांना शेतकरी बांधव दिसून येत आहे.

तर दुसरीकडे अशातच छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील शिऊर (ता. वैजापूर) येथे युरिया खताच्या कृत्रिम टंचाईस शेतकरी बांधव सामोरे जात आहे. युरिया खरेदीसाठी गेलेल्या शेतकर्‍यांस साठा शिल्लक नाही, दोन दिवसात गाडी येईल तेव्हा मिळेल अशी उत्तरे कृषी सेवा केंद्रांकडून शेतकर्‍यांना मिळत आहे. 

गेल्या वर्षी कापूस आणि सोयाबीनला अपेक्षित बाजारभाव नसल्याने शेतकर्‍यांच्या हाती फार काही उत्पन्न आले नाही. त्यामुळे नियमित पाऊस पडण्याआधी खते खरेदी करून ठेवणारे शेतकरी पावसाळयाआधी खत खरेदी करू शकले नाही. मात्र आता पिकांच्या ऐन वाढीच्या अवस्थेत त्यांना खते देणे गरजेचे असल्याने शेतकरी कृषी सेवा केंद्रांच्या दारात रिकाम्या हाती चकरा मारतांना दिसून येत आहे. 

शिऊर मध्ये सुरू असलेल्या या युरियाच्या साठेबाजी विषयी 'लोकमत अ‍ॅग्रो' ने शिऊर मंडल कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. तर युरिया खताचा साठा असूनही शेतकर्‍यांची पिळवणूक होत असतांना कृषी विभाग केवळ आपल्या कार्यालयात व्यस्त आहे का ? असा प्रश्न या निमित्ताने शेतकरी बांधव विचारत आहे.

मका पिकाला युरिया खताची सर्वाधिक गरज असते. सध्या आंतर मशागत करण्याचे काम सुरू असल्याने याच वेळी युरिया दिला तर तो मातीआड जातो सोबत फायद्याचा असतो. या कारणाने युरिया खरेदी साठी कृषी सेवा केंद्रात गेलो असतो तिथे युरिया शिल्लक नसल्याचे सांगत दुसरे खत घेऊन जा ते पण चालतं असा सल्ला दिला जातो. - मच्छिंद्र पंडितराव जाधव (शेतकरी, शिऊर ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर).

युरिया सर्वत्र मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून कुठेही कमतरता नाही, दुकानदार नाही म्हणून अडवणूक करत असल्यास तसे कळवावे म्हणजे कार्यवाही करता येईल, दुकांनदारांनी शेतकऱ्यांची अडवणूक करू नये, तसे आढळल्यास सक्त कार्यवाही केली जाईल - व्यंकट ठक्के (तालुका कृषी अधिकारी, वैजापुर).

टॅग्स :खतेखरीपपीक व्यवस्थापनशेतकरीशेतीवैजापूरऔरंगाबादमराठवाडाशेती क्षेत्र