मराठवाड्यात पावसाची पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन मागील काही दिवसात पावसाने दिलेला खंड व वाढते तापमान यामूळे, कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव वाढला आहे याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा व्हर्टिसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा ॲसिटामाप्रीड 20% 40 ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7% 168 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्यास प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली प्रति एकर आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारावे. तूर पिक 55 ते 60 दिवसाचे झाले असल्यास तूरीचे शेंडे खुडावे यामूळे तूर पिकाला जास्तीत जास्त फांद्या फुटतात. वेळेवर पेरणी केलेल्या तुर पिकात पाने गुंडाळणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा क्विनॉलफॉस 25% 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
मागील काही दिवसात पावसाने दिलेला खंड व वाढते तापमान यामूळे, मूग/उडीद पिकात मावा किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची किंवा डायमिथोएट 30 % 240 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. मागील काही दिवसात पावसाने दिलेला खंड व वाढते तापमान यामूळे, भूईमूग पिकात मावा, फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
वेळेवर पेरणी केलेल्या भुईमूग पिकात अऱ्या सुटण्याच्या अवस्थेत शक्य असल्यास भुईमूगाच्या पिकावरून रिकामे ड्रम फिरवावे. त्यामूळे अऱ्या जमिनीत घुसण्यास मदत होऊन शेंगाची संख्या वाढते परिणामी उत्पादनात वाढ होते. मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 80 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 80 मिली प्रति एकर वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.
फळबागेचे व्यवस्थापन काढणीस तयार असलेल्या केळी घडांची काढणी करून घ्यावी. द्राक्ष बागेत नविन फुटणाऱ्या फुटव्यांवर भूरी व करपा या रोगाचा प्रादूर्भाव दिसू शकतो, त्यामूळे अतिरिक्त असलेल्या फुटी काढून टाकाव्यात व आवश्यक फुटी तारांवर व्यवस्थित बांधून घ्याव्यात. त्यामूळे आर्द्रता कमी होऊन वेलींमध्ये हवा खेळती राहील. सिताफळ बागेत पिठया ढेकून किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास निंबोळी तेल 50 मिली किंवा व्हर्टिसीलीयम लॅकेनी जैविक बुरशी 40 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
भाजीपाला भेंडी व काकडी वर्गीय पिकावरील भुरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी मायक्लोब्युटॅनील 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. फुलशेती काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची काढणी करून घ्यावी. पशुधन व्यवस्थापन तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असल्यामूळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी.
पशुधनाची घ्यावी अशी काळजी
गोवंशीय पशुधनामध्ये लम्पी स्कीन रोगाचा प्रादूर्भाव अत्यंत वेगाने होत आहे. याची सर्वात जास्त झळ लहान वयातील वासरांना जाणवत असून मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी नियंत्रणासाठी व त्यांची शारिरीक प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काही गोष्टी करणे महत्वाचे आहे.
1) वासरांना चिक पाजावा.2) वयाच्या सातव्या दिवशी जंतनाशक औषधीची मात्रा द्यावी.3) महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शक तत्वानूसार लसीकरण करून घ्यावे.4)आजारी आणि निरोगी वासरे, गोधन स्वतंत्र पणे विलगीकरण करावे.5) सर्वात महत्वाचे म्हणजे 20% सूश्रूषा व 80% काळजी (ज्यामध्ये पाणी, सकस चारा, जखमांची सुश्रुषा ईत्यादी) गोष्टी कराव्यात.6) “माझे पशुधन माझी जबाबदारी” या सुत्रानूसार आपल्या गोवंशीय पशुधनाची या कालावधीमध्ये जास्तीत जास्त काळजी घ्यावी.
सामुदायिक विज्ञान बालकांची स्व-मदत कौशल्य विकसित होण्यासाठी त्यांना स्वत:च्या हाताने हाताने दूध पिणे, खाणे, भांग पाडणे, पावडर लावणे, स्वत:च्या कपडयांच्या गुंडया लावणे अशी कामे मोठयांच्या देखरेखी खाली करू द्यावी. ईतर पिकात हूमणीच्या अळ्या दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटाराईझीयम ॲनोसोप्ली या जैविक बूरशीचा 4 किलो (जास्त प्रादुर्भाव असल्यास 10 किलो) प्रति एकर जमिनीतून वापर करावा.