पंतप्रधान किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करून घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यांना २००० रुपये दिले जाणार आहेत. त्यासाठीची अर्जप्रक्रिया १५ एप्रिलपासून सुरू होणार आहे.
पंतप्रधान किसान योजना योजनेमध्ये पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत मिळते. २,००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातात.
आतापर्यंत या योजनेचे १९ हप्ते जमा झाले आहेत. म्हणजे, ३८,००० रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत. या योजनेचा २० वा हप्ताही लवकरच जारी केला जाणार आहे. पण, याच्या लाभापासून विविध कारणांनी वंचित असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार का नाही? असा प्रश्न पुढे येत होता.
कागदपत्रातील त्रुटींमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत. शेतीचा वारसा बदलणे, शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर त्याची मालकी बदलणे आदी कारणांनी शेतकरी लाभापासून वंचित आहेत.
काहींच्या बँक खात्यात त्रुटी आहेत, तर काहींना सुरुवातीचे काही हप्ते मिळून नंतर बंद झाले आहेत. लाभ मिळावा यासाठी शेतकरी तलाठी, तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज देत आहेत.
या शेतकऱ्यांना आता पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे. १५ एप्रिलपासून नव्याने नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. या योजनेअंतर्गत लहान शेतकरी अर्ज करू शकतात. शेतकऱ्याचे नाव राज्य किंवा केंद्र सरकारच्या जमिनीच्या नोंदींमध्ये नोंदवलेले असावे.
तसेच, आधार कार्ड, बैंक खाते आणि मोबाइल क्रमांक योजनेशी जोडलेले असावेत. या शेतकऱ्यांना योजनेच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. या शेतकऱ्यांना मागील हप्ते मिळणार का? याबाबत मात्र स्पष्टता नाही.
लाभार्थ्यांनी नोंदणीसाठी असा करावा अर्ज
योजनेचे अधिकृत संकेतस्थळ https://pmkisan.gov.in वर नोंदणी करता येईल. नवीन शेतकरी हा पर्याय निवडावा. राज्य, आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक नोंदवावा. ओटीपी नोंदवावा. शेतकऱ्याची व्यक्तिगत माहिती, जमिनीची माहिती, बैंक खाते ही माहिती भरून अर्ज सबमिट करावा. तलाठी कार्यालय, कृषी सहायक, कॉमन सेवा केंद्रांतून ऑफलाइन अर्जही भरता येतील.
हेही वाचा : ऑनलाईन माहिती घेत रणजित करताहेत शेती; १० गुंठे क्षेत्रात झाली अडीच लाखांची पपई