Join us

Kharif Perani कापूस, सोयाबीनचे क्षेत्र वाढले; राज्यात ६८ टक्के पेरण्या झाल्या पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 9:58 AM

राज्यात सध्या सुरू असलेल्या दमदार पावसामुळे खरीप पेरण्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, राज्यात आतापर्यंत ६८ टक्के अर्थात ९६ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

पुणे : राज्यात सध्या सुरू असलेल्या दमदार पावसामुळे खरीप पेरण्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, राज्यात आतापर्यंत ६८ टक्के अर्थात ९६ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन व कापसाचा पेरा वाढला आहे.

सोयाबीन क्षेत्रात ९१ टक्के तर कापूस पिकाखालील क्षेत्रात ७६ टक्के पेरणी झाली आहे, अशी माहिती राज्याचे कृषी संचालक विनय आवटे यांनी दिली. सर्वाधिक ८७ टक्के पेरण्या संभाजीनगर विभागात झाल्या आहेत.

राज्यात खरीप पिकाखालील सर्व क्षेत्र १ कोटी ४१ लाख २ हजार ३१८ हेक्टर इतके असून, आतापर्यंत ९६ लाख ४४ हजार ४१७ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत.

राज्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ४१ लाख ४९ हजार ९१२ हेक्टर असून, राज्यात आतापर्यंत ३७ लाख ५७ हजार २९७ हेक्टरवर अर्थात ९१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. राज्यात आतापर्यंत ३१ लाख ९१ हजार २८९ हेक्टरवर अर्थात ७६ टक्के क्षेत्रावर कापसाची पेरणी झाली आहे.

सरासरी ४२ लाख १ हजार १२८ हेक्टर क्षेत्र कापसाखाली आहे. गेल्यावर्षी याच तारखेला केवळ १२ लाख ३७ हजार ८५५ हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती.

संपर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यांत भातरोपांची लावणी करण्याचे कामही सुरू आहे. आतापर्यंत १ लाख ५४ हजार १५८ हेक्टर अर्थात १० टक्के क्षेत्रावर भाताची लागवड पूर्ण झाली आहे.

पीकनिहाय पेरणीविभाग - पेरणी झालेले क्षेत्र - टक्केतूर - ८,३३,३७६ - ६४मूग - १,७४,२२३ - ४४उडीद - २,५८,३४८ - ७०ज्वारी - ५६,७२९ - २०बाजरी - ३,०८,२७८ - ४६भुईमूग - ९८,८०३ - ५२

राज्यात पाऊस चांगला झाला आहे. पेरणी झालेल्या पिकाला आता खते टाकावीत. आंतरमशागतीची कामे करावीत. - विनयकुमार आवटे, कृषी संचालक

टॅग्स :पेरणीपीकखरीपमहाराष्ट्रशेतकरीशेतीसोयाबीनकापूस