Join us

तुरीचे पीक जोमात; यंदा उत्पन्न वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 2:00 PM

कीडीपासून वेळीच करा संरक्षण..

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिऊरसह परिसरात खरिपात पेरणी केलेल्या तुरीच्या पिकाला कमी पावसाचा तडाखा बसला आहे; मात्र तरीही हे पीक सध्या बहरात असून, तुरीच्या शेतात कळी व फुलांनी पिवळा शालू पांघरला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. खरिपातील इतर पीक जरी गेले, तरी तुरीच्या पिकातून उत्पन्न हाती येण्याची शेतकऱ्यांना आशा आहे. मात्र, हवामान बदलामुळे या पिकावरही किडीचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे.

शिऊर परिसरात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली खरिपांतील कापूस, मका, सोयाबीन व इतर नगदी पैसा देणारी पिके हातातून गेली. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींत मोठी वाढ झाली आहे. मात्र, शेवटी झालेल्या पावसाचा तूर पिकाला फायदा झाला असून, हे पीक सध्या चांगलेच बहरले आहे. यातून किमान आधार मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. सध्या तूर पीक फुलोऱ्यात असून, एक ते दीड महिन्यात तूर घरात येईल. मात्र, हवामान बदलामुळे या पिकावरही किडीचा प्रादुर्भाव वाढत असून, शेतकरी चिंतेत पडले आहेत. पीक वाचविण्यासाठी अनेक शेतकरी महागड्या औषधांची, कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. किडीपासून तुरीचे संरक्षण करण्यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सल्ला दिला जात आहे.

तुरीला किडीपासून वाचविण्यासाठी फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेतील पिकाचे सर्वेक्षण करावे. शेतात २० ते २५ ठिकाणी प्रती मीटर ओळीच्या अंतरात अळी दिसून आल्यास कीटकनाशकांची फवारणी करावी. -आदिनाथ सपाटे, कृषी सहायक, शिऊर

२० ग्रॅम किंवा नोवलुरोन ५.२५ इंडोक्झाकार्ब ४.५० एससी १६ मिली यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन केले आहे.

तुरीच्या पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव, कसे कराल संरक्षण?

पीक पोखरणाऱ्या अळ्या

सध्या तुरीच्या पिकावर शेंगा पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेंगा पोखरणाऱ्या अळ्या सुरुवातीला पिकाच्या कोवळ्या पानांवर फुलांवर किंवा शेंगांवर उपजीविका करतात. नंतर शेंगा भरताना त्या दाणे खातात. दाणे खात असताना त्या शरीराचा पुढील भाग शेंगांमध्ये खुपसून व बाकीचा भाग बाहेर ठेवलेल्या अवस्थेत शेतात आढळतात. त्यामुळे आतील कोवळ्या दाण्याचे जवळपास ६० ते ८० टक्के नुकसान होते.

 

टॅग्स :तूरशेतकरीहवामान