Join us

अर्जुन मुंडा हे देशाचे नवे कृषिमंत्री; कृषी मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2023 11:17 AM

नरेंद्र तोमर यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांच्याकडे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाची धुरा सोपवली आहे.

नरेंद्र तोमर यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांच्याकडे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाची धुरा सोपवली आहे. अर्जुन मुंडा हे तीन वेळा झारखंडचे मुख्यमंत्री होते आणि मे २०१९ मध्ये त्यांची केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

गुरुवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र तोमर यांचा राजीनामा स्वीकारला आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार मुंडा यांच्याकडे सोपवला.  राजीव चंद्रशेखर, शोभा करंदलाजे आणि भारती प्रवीण पवार यांच्याकडेही अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याकडे राज्यमंत्री म्हणून जलशक्तीचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांना अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्रिपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे, असे निवेदनात म्हटले आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांच्याकडेही आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

टॅग्स :मंत्रीशेती क्षेत्रकेंद्र सरकारसरकारनरेंद्र मोदीराष्ट्राध्यक्ष