Join us

एक लाख जनावरांच्या खाद्याची व्यवस्था; दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 2:40 PM

अवकाळी पावसामुळे वाढले शाळू ज्वारीचे उत्पन्न : उत्पादकांकडून बाजारपेठेत विक्री

विष्णू वाकडे 

जालना तालुक्यात यावर्षी रब्बी हंगामामध्ये पडलेल्या अवेळी पावसाने शेतकऱ्यांनी पेरलेली शाळू ज्वारीचा चारा फायदेशीर ठरला आहे. उत्पन्न फार झाले नसले तरी काही शेतकऱ्यांना रब्बी ज्वारीच्या चाऱ्याची बाजारात विक्री करून दोन पैसे मिळत आहेत. जालना तालुक्यातील तब्बल १ लाख ११ हजार पशुधनाला लागणाऱ्या खाद्याचे नियोजन करावे लागणार आहे.

जालना तालुक्यामध्ये सोयाबीन काढणीनंतर लगेचच शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पेरणीचे नियोजन केले आहे. ओलाव्यावर कृषी विभागाच्या मार्गदर्शनात तालुक्यात हरभऱ्याची पेरणी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. तसेच गव्हाचीदेखील पेरणी करण्यात आलेली आहे. परंतु, अवकाळी पडलेल्या पावसाने रब्बी हंगामात पेरणी झालेल्या पिकांची वाट लागली आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे चाऱ्या पिकाची उगवण झाली आहे.

ना दुष्काळाची चिंता ना अवकाळीचा फटका; आता वर्षभर पुरेल हिरवा चारा

जनावरांना पोष्टीक खाद्य उपलब्ध

चाऱ्याची व्यवस्था झाली

२०१२ आणि २०१६ मध्ये पडलेल्या दुष्काळात चाऱ्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली होती. जालना तालुक्यामध्ये जनावरांच्या प्रवर्गाचा विचार केल्यास गार्ड या वर्गात मोडणाऱ्या जनावरांची संख्या ६० हजार ३१४ एवढी आहे. तसेच म्हशींची संख्या १८ हजार २२१ एवढी आहे. शेळी वर्गातील जनावरांची संख्या ३२ हजार ४२८ आहे. मेंढ्यांची संख्या ३ हजार २३८ इतकी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चाराटंचाई सातत्याने निर्माण होत आहे. मात्र, यंदा पशुधनाच्या चाऱ्याची उपलब्धता असल्याचे दिसून येत आहे. - पंडित डोंगरे, शेतकरी, सावरगाव.

चाऱ्याचे नियोजन महत्त्वाचे

मोठ्या जनावरांना सरासरी सहा ते सात किलो खाद्य प्रति दिवस लागते. छोट्या जनावरांना खाद्य कमी लागत असले तरी पौष्टिक खाद्य दिल्याने पशुधनाचे आरोग्य चांगले राहते. शिवाय दुभत्या जनावरांना अधिकचे खाद्य लागते. शेतकऱ्यांनी पशुधनासाठी हिरव्या चाऱ्यासोबत कोरड्या चाऱ्याचे केलेले नियोजन महत्त्वाचे ठरते. - डॉ. नितीन संगेकर, पशुवैद्यकीय अधिकारी, जालना.

तालुक्यात ज्वारीचे पीक उपलब्ध

• यावेळी पडलेल्या या पावसामुळे कोरडवाहू जमिनीमध्ये शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील शाळू ज्वारीची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली आहे. यामुळे तालुक्यात ज्वारीचे पीक सर्वत्र आले आहे.

• यावर्षी बाजारामध्ये पशुधनाच्या चाऱ्याला पाहिजे तसा भाव नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पशुधन नाही, अशांनी चारा बाजारात विक्रीला आणला आहे.

• या चाऱ्याच्या पेंढ्याला प्रति शेकडा ७०० ते ८०० रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे एक पेंडी ७ ते ११ रुपयांपर्यंत मिळते. दुष्काळात याच पेंडीचा भाव २५ ते ३० रुपयांपर्यंत जातो.

टॅग्स :दुग्धव्यवसायशेतकरीशेतीमराठवाडा