Join us

आरोग्याच्या समस्या वाढल्याने; लाकडी घाण्यावरील तेलाला मागणी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2024 12:28 PM

घाण्याचे तेल उपयुक्त असल्याने मागणी वाढली.

सध्या बाजारात अनेक कंपन्यांचे रिफाइंड तेल विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या तेलाच्या विक्रीसाठी विविध प्रकारच्या माध्यमांवर कंपन्यांकडून जाहिराती करून या तेलाची विक्री वाढवण्याचा प्रयत्न केला जातो; मात्र मागील काही वर्षांपासून केमिकलयुक्त असलेल्या या तेलांमुळे कोलेस्ट्रॉल, सांधेदुखी, गुडघेदुखीसह इतर आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे रसायनविरहित असलेल्या लाकडी घाण्यातून काढलेल्या तेलाला मोठी मागणी होत आहे.

ग्रामीण भागातील इतिहासजमा झालेले लाकडी घाण्याचे महत्त्व कंपन्यांच्या भेसळयुक्त तेलामुळे पुन्हा वाढू लागले आहे. पूर्वी महिला करडईपासून घरी तेल बनवत होत्या किंवा पारंपरिक पद्धतीने लाकडी घाण्याद्वारे सर्व प्रकारचे खाण्याचे तेल काढले जायचे. या तेलाचा सर्वजणच खाण्यासाठी वापर करीत असत.

मात्र, कालांतराने हळूहळू लाकडी घाणे बंद झाले व लुप्त एक्सप्लोर मशीनद्वारे तेल काढले जाऊ लागले. तेलाच्या वाढत्या मागणीमुळे पुढे मोठ्या कंपन्या बाजारात आल्या. रिफाइंड तेलनिर्मिती करून भेसळ करून विकू लागल्या. बदलत्या आहार-विहाराला अशा तेलामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढत आहे. त्याचबरोबर इतरही आजार वाढत आहेत. हे प्रमाण कमी करण्याच्या अनुषंगाने सुज्ञ नागरिक लाकडी घाण्यावरील तेलाचा वापर करीत आहेत.

पूर्वी खेडोपाडी तेल काढण्याचे घाणे होते. घरी शेतात पिकवलेले सूर्यफूल, करडी, शेंगदाणे, तीळ हे गळीत धान्य घाण्यावर नेऊन त्याचे तेल काढले जात असे. त्याची निघणारी पेंड पशुखाद्य म्हणून उपयोगाला यायची. त्यामुळे कुठलीही भेसळ नसलेले शुद्ध तेल खाण्यास मिळत होते. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील अनेक शेतकरी स्वतःला आणि कुटुंबीयांना शुद्ध तेल मिळावे, यासाठी तेलबियांचे उत्पन्न घेत असल्याचे दिसून येत आहे. तीळ, सूर्यफूल, शेंगदाणा यांची लागवड मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. लाकडी घाण्याच्या तेलाचे कुठलेही दुष्परिणाम नाहीत.

आरोग्याच्या समस्या वाढल्या 

अलीकडील काळात वेळेवर पाऊस पडत नाही. त्यामुळे पेरण्या उशिरा होतो. तसेच, करडईचा पेराही घटल्याने उत्पादन होत नाही. त्यामुळे बाजारातील तेलाचा वापर वाढला होता. आता बाजारातील तेल केमिकलयुक्त येत असल्याने आरोग्याच्या समस्यांत वाढ होत आहे. त्यामुळे करडई विकत घेऊन घाण्यावरून तेल काढून वापर केला जात आहे. - अप्पासाहेब चव्हाण, पोखरी टकले.

घाण्याचे तेल उपयुक्त

पूर्वी करडई, सूर्यफुलाचे उत्पादन घेतले जात होते. पूर्वी उत्पादित केलेली पिके आता उत्पादन देत नाहीत. त्यामुळे तेलबियांचे उत्पादन कमी होत असल्याने बाजारात मिळेल त्या भावात तेल घ्यावे लागते. लोकसंख्येनुसार तेलाची मागणी वाढत आहे. त्यामुळे कंपन्यांचे पॅकिंगमध्ये येणार तेल भेसळ आणि केमिकलयुक्त असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे घाण्याचे तेल स्वतः काढून घेऊन वापरलेले कधीही चांगले आहे. - चंद्रभागाबाई काळे, माजी सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती, मंठा.

हेही वाचा - निंबोळी अर्काच्या वापरामुळे वाचतो २५ टक्क्याहून अधिक कीटकनाशकांचा खर्च

टॅग्स :आरोग्यशेतीतेल शुद्धिकरण प्रकल्पअन्न