Join us

Crop Damage : राज्यात ऑक्टोबरमध्ये तब्बल ३० हजार ५०६ हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 1:14 PM

Crop Damage Due to Rain : ऐन पीक कापणीच्या वेळेस परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा तडाखा दिला आहे. राज्यात ऑक्टोबरमध्ये तब्बल ३० हजार ५०६ हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

पुणे : ऐन पीक कापणीच्या वेळेस परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा तडाखा दिला आहे. राज्यात ऑक्टोबरमध्ये तब्बल ३० हजार ५०६ हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील २६ हजारांहून अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाला याचा सर्वात मोठा फटका बसला आहे.

परतीच्या मान्सूनने राज्यातील अनेक भागांना तडाखा दिला आहे. १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे काढणीला आलेल्या सोयाबीन, मका, कापूस, बाजरी, भाजीपाला, कांदा, ज्वारी, मूग, उडीद, भात अशी उभी पिके झोपली.

या पिकांचे पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चार महिन्यांची मेहनत पाण्यात वाहून गेली आहे. नुकसान झालेल्या भागांमध्ये प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र, विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे.

चार जिल्ह्यांनाच अधिक फटका■ ऑक्टोबरच्या पंधरा दिवसांमध्ये राज्यातील ठाणे, नाशिक, सांगली व भंडारा या चार जिल्ह्यांमधील ३० हजार ५०४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने तातडीने पंचनामे केले आहेत■ सर्वाधिक २६ हजार ३३८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान एकट्या नाशिक जिल्ह्यातील झाले आहे.■ त्या खालोखाल २ हजार ४२४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान सांगली जिल्ह्यात झाले आहे.■ भंडारा जिल्ह्यात १ हजार २८० तर ठाणे जिल्ह्यात ४५१ हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

पावसाने अतोनात पिकांचे केले असून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे महसूल विभाग तसेच कृषी विभागाच्या समन्वयातून केले जात आहेत. पंचनाम्यांचा अहवाल जिल्हा प्रशासनामार्फत राज्य सरकारला पाठविण्यात येणार आहे. - रफिक नायकवडी, कृषी संचालक, पुणे

टॅग्स :पाऊसमहाराष्ट्रपीकरब्बीशेतीशेतकरीसरकारनाशिकभंडारासोयाबीन