Join us

Cotton : कापसाच्या ८६४ च्या पाकिटाची १४०० रुपयांना विक्री; कृषी सेवा केंद्रचालकावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 12:33 PM

Cotton Seeds Selling in high price तेल्हारा तालुक्यातील अडसूळ येथे कृषी विभागाच्या भरारी पथकाची कारवाई

अकोला (Akola) जिल्ह्यात कपाशीच्या विशिष्ट वाणाच्या बीटी बियाणाचा काळाबाजार होत असल्याचे समोर आले आहे. तेल्हारा तालुक्यातील अडसूळ येथील कृषी सेवा केंद्रामध्ये बियाणे जादा दराने विक्री होत असल्याचे कृषी विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत उघड झाले आहे. तेल्हारा पंचायत समितीचे कृषी अधिकारी भरतसिंग चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून अडसूळ येथील अश्विनी अॅग्रो एजन्सीचे प्रोप्रा. रामकृष्ण रामचंद्र पोहरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात कपाशीच्या विशिष्ट वाणाच्या बियाणासाठी शेतकरी पहाटेपासूनच कृषी सेवा केंद्रांवर रांगा लावत आहेत; परंतु बियाणे मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले. असे असताना 'त्या' वाणाच्या बियाण्याची (seeds) जादा दराने विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली.

त्यामुळे कृषी विभागाच्या भरारी पथकाने डमी ग्राहकाच्या माध्यमातून बियाणे विक्री करणाऱ्या केंद्रावर छापा टाकून प्रतिपाकीट ८६४ रुपये मूळ किंमत असलेले १४०० रुपये याप्रमाणे जादा दराने विक्री होत असल्याचे रंगेहात पकडले. त्यामुळे पंचायत समितीचे कृषी अधिकारी भरतसिंग चव्हाण यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून अडसूळ येथील मे. अश्विनी अॅग्रो एजन्सीचे प्रोप्रायटर रामकृष्ण रामचंद्र पोहरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकाचा आग्रह न धरता पर्यायी वाणांची निवड करावी !

शेतकऱ्यांनी कपाशीच्या (Cotton) विशिष्ट वाणाचा आग्रह न धरता बाजारात उपलब्ध त्याच दर्जाच्या इतर पर्यायी वाणांची निवड करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार, कृषी विभाग यांच्याबरोबरच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केले आहे. खरीप हंगामासाठी कपाशीच्या एकाच कंपनीच्या वाणाची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे.

मात्र, नैसर्गिक आपत्तीमुळे (Unseasonal Rain) त्या कंपनीचे बीजोत्पादन कमी झाल्याने पुरवठ्यावर मर्यादा असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. त्याच दर्जाचे इतर समतुल्य वाणही बाजारात उपलब्ध आहे. जिल्ह्यात कपाशीच्या इतर वाणांचा मुबलक साठा उपलब्ध असून, त्यांची निवड करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, कृषी विकास अधिकारी मिलिंद जंजाळ यांनी केले आहे.

भरारी पथकाने केली कारवाई

• मिळालेल्या गुप्त माहितीवरून जिल्हा कृषी अधीक्षक शंकर किरवे, जि.प.चे जिल्हा कृषी विकास अधिकारी मिलिंद जंजाळ यांच्या मार्गदर्शनात तालुका, जिल्हा भरारी पथकाने छापा टाकून कारवाई केली.

• या पथकामध्ये मोहीम अधिकारी महेंद्रकुमार सालखे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सतीशकुमार दांडगे, तालुका कृषी अधिकारी गौरव राऊत, पंचायत समितीचे कृषी अधिकारी भरतसिंग चव्हाण, विस्तार अधिकारी कोमल भास्कर, कृषी सहायक प्रदीप तिवाले यांचा समावेश होता.

हेही वाचा - Success Story आधुनिक तंत्रज्ञानाचा वापराने भुईमुगाचे विक्रमी उत्पादन 

टॅग्स :कापूसविदर्भशेतकरीशेतीमराठवाडाशेती क्षेत्र