Join us

पाऊस पडताच ८६४ चे कपाशी बियाणे १२०० रुपयांना; व्यापाऱ्यांकडून शेतकरी बांधवांची लूट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 3:15 PM

काही दुकानांत बियाणे, खत उपलब्धतेचे फलकच नाहीत ..

बीड जिल्ह्यातील माजलगाव शहर व परिसरात शनिवारी पहाटे झालेल्या जोरदार पावसामुळे बी-बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी दुकानांमध्ये गर्दी केली होती. या गर्दीचा फायदा घेत कृषी दुकानदारांकडून शेतकऱ्यांची लूट होताना दिसून येत आहे. तालुका कृषी अधिकाऱ्याला हाताशी धरून व्यापारी ८६४ रुपयांना मिळणारी बियाण्याची बॅग १२०० रुपयांना बिनबोभाट विकताना दिसत आहेत.

मागील दोन दिवसांपासून थोड्याफार झालेल्या पावसामुळे शेतकरी बी-बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी दुकानांमध्ये गर्दी करत आहेत. याचा फायदा कृषी दुकानदार घेताना दिसून येत आहेत.

सध्या शेतकऱ्यांकडून कपाशीच्या विशिष्ट वाणाची मोठ्या प्रमाणात मागणी दुकानदारांकडे होत आहे. शेतकरी दुकानात गेल्यानंतर वाण शिल्लक नसल्याचे सांगत आहेत. नंतर जादा पैसे उकळले जात आहेत. बियाणे तसेच दिल्या जाणाऱ्या बिलांबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढत असताना बाजारात तपासणी करण्याऐवजी येथील तालुका कृषी अधिकारी शिवप्रसाद संगेकर हे मूग गिळून गप्प आहेत.

काम अधिकाऱ्यांचे, म्हणतात तक्रार द्या !

माजलगाव शहर व तालुक्यात जवळपास १५० कृषी दुकाने आहेत. यातील १०-२० दुकाने सोडता उर्वरित दुकानांमध्ये शिल्लक असलेली खते, बी- बियाण्यांचा साठा किती आहे, याचे फलकच आढळून येत नाहीत. यामुळे दुकानदार शेतकऱ्यांना पाहिजे ते बियाणे चढ्या भावाने विकताना दिसत आहेत. याबाबत येथील तालुका कृषी अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, ज्या दुकानात फलक नाही त्याची तक्रार द्या. आम्ही कारवाई करू, असे उत्तर मिळत आहे,

कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात त्यांचेच दुर्लक्ष

महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यातच खते व बी- बियाण्यांचा तुटवडा आहे. याचा फायदा घेत कृषी दुकानदार शेतकऱ्यांची लूट करत आहेत. त्यांना कृषी अधिकारी साथ देताना दिसत आहेत. यामुळे कृषिमंत्र्यांनी अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत व चढ्या भावाने बियाणे विकणाऱ्या दुकानदारांचा परवाना रद्द करावा. - अॅड. नारायण गोले, शेतकरी नेते.

बियाणे ज्यादा दराने विक्री होत असल्याच्या आमच्याकडे तक्रारी आलेल्या नाहीत. जास्त दराने कोणी विक्री केल्याची तक्रार आल्यास कारवाई केली जाईल. - शिवप्रसाद संगेकर, तालुका कृषी अधिकारी, माजलगाव.

हेही वाचा - शेतकऱ्यांनो, सोयाबीनचे एकरी उत्पादन वाढवायचे ना? मग करा या अष्टसूत्रीचा वापर!

 

टॅग्स :कापूसपेरणीलागवड, मशागतखरीपबीडशेतकरीशेतीमराठवाडा