मागील वीस वर्षांनंतर हळदीच्या झाळाली मिळाली असून, अनेक शेतकऱ्यांनी मागील काही वर्षांपासून हळद लागवडीकडे पाठ फिरविली होती. त्या शेतकऱ्यांनी हळदीचे बेणे खरेदी करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. यामुळे हळदीच्या बेण्याचे दर गगनाला भिडले असून, पुढील काळात हळदीच्या क्षेत्रात मोठी वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसे झाले तर पुढील वर्षात हळद शेतकऱ्यांना पिवळं करेल की शेतकऱ्यांचे वाटोळे होईल, हे पाहावे लागणार आहे.
अर्धापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी हळदीचे बेणे खरेदी करताना दिसून येत आहेत. तसेच मागील वर्षात ज्या शेतकऱ्याकडे एक किंवा दोन एकर हळद लागवड केली होती, तो शेतकरी पुढील काळात तीन ते चार एकरांत हळद लागवड करण्याच्या मनस्थितीत आहे. तर मागील काही वर्षांपासून हळद लागवडीकडे पाठ फिरविणारे शेतकरी सुद्धा हळद लागवड करण्यासाठी बेण्याची खरेदी करताना दिसून येत आहेत.
गतवर्षी अनेक शेतकऱ्यांनी बेणे साठवून ठेवले होते. परंतु बेणे खरेदीदार मिळाला नव्हता. मात्र, यंदा बेणे खरेदीदार अनेक आहेत. पण बेण्याचे दर वाढले आहेत. मागील वर्षात दोन ते अडीच हजार रुपये क्विंटल बेण्याला भाव मिळाला होता. यंदा हळदीला बाजारपेठेत चांगला दर मिळत असल्याने बेण्याचीही किमत वाढली आहे. हळदीवर करप्या रोगाचा परिणाम झाल्यामुळे उत्पन्न कमी झाले.
हळदीला मिळाली झळाळी
■ नवीन हळदीची आवक सुरू झाल्यापासून हळदीच्या दरात वाढ होत गेली आहे. मध्यंतरी काही दिवसांसाठी हळदीच्या दरात घसरण झाली होती. पुन्हा हळदीला झळाली मिळाली आहे.
■ नांदेड मोंढ्यात हळदीची आवक बऱ्यापैकी सुरू असून, १५ हजार ते १८ हजारांपर्यंत सरासरी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. यामुळे ५ हजार ते ५ हजार पाचशे रुपये भाव देऊन शेतकरी बेणे खरेदी करीत आहेत.
■ मात्र, बाजारपेठेत चांगला भाव मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला असून, याच आशेवर अनेक शेतकऱ्यांनी पुढील काळात लागवड करण्यासाठी बेण्याची खरेदी सुरू केली आहे. पुढील वर्षी देखील हळदीला भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.