राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत साडेचारशे ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदान निधीची राज्यस्तरावर संगणकीय सोडत लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानपरिषदेत दिली. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदान निधी दिला नसल्याबाबतचा प्रश्न सदस्य सतेज पाटील यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. या चर्चेत विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, जयंत पाटील आदींनी सहभाग घेतला.
यावेळी श्री. वळसे पाटील म्हणाले की, राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्रांना अनुदान प्रकल्पांतर्गत कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर सद्यस्थितीत वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, साखर कारखाने यांच्याकडून ७३०० अर्ज प्राप्त झाले आहेत. या प्रकल्पास २०२३-२४ करिता रुपये ९६.३९ कोटी इतका अतिरिक्त नियतव्यय मंजूर केल्याचे ३ नोव्हेंबर २०२३ च्या पत्रान्वये केंद्र शासनाने कळविले आहे.
या मंजूर नियतव्ययानुसार प्राप्त होणाऱ्या निधीच्या अधीन राहून ऊस तोडणी यंत्रासाठी प्राप्त झालेल्या अर्जाची राज्यस्तरावर संगणकीय सोडत काढण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अनुषंगिक बदल करण्याचे काम महाआयटी विभागाकडून सुरू आहे. ऊस तोडणी यंत्रासाठी राज्य सरकार राज्यस्तरीय योजना आणण्याबाबत शेतकरी, साखर कारखानदार, ऊस तोडणी संघटना यांच्याशी चर्चा करेल, असे श्री. वळसे पाटील यांनी सांगितले.