अरुण बारसकरदरवाढीचा विषय मार्गी लागत नसल्याने राज्यातील ऊस गाळपावर परिणाम झाल्याचे दिसत आहे. मागील १९ दिवसांत केवळ १३७ कारखान्यांनी ७८ लाख मेट्रिक टन इतकेच गाळप केले आहे. मागील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पाण्यात ऊस असतानाही आतापर्यंत १७७ कारखान्यांचे १४२ लाख मेट्रिक टन गाळप झाले होते.
मागील वर्षी बहुतांशी ऊस क्षेत्रात नोव्हेंबर महिन्यातही पाणी होते तर यावर्षी ऐन पावसाळ्यातही उसाला पाणी मिळाले नाही. पाऊस नसल्याने ऊस वाढीवर कमालीचा परिणाम झाल्याचे दिसत आहे. यावर्षी ऊस गाळपाला परवानगीही एक नोव्हेंबरपासून देण्यात आली. मात्र कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर व काही जिल्ह्याच्या काही भागांत ऊस दरासाठी शेतकरी आडून बसले आहेत. त्यामुळे साखर कारखाने सुरू होण्यासही उशीर झाला आहे. शिवाय सुरू झालेले बहुतेक कारखाने उसाअभावी पूर्ण क्षमतेने चालत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे गाळप हंगाम सुरू करण्यास १८४ साखर कारखान्यांना परवाना दिला असला तरी अवघे १३७ साखर कारखाने सुरू होऊ शकले.
मागील वर्षी आतापर्यंत राज्यात तब्बल १७७ साखर कारखान्यांच्या चिमण्या सुरू झाल्या होत्या व एक कोटी ४२ लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाला होता. मागील वर्षी बहुतेक साखर कारखान्यांची ऊस तोडणी यंत्रणा सक्षम होती. यावर्षी अनेक कारखान्यांकडे ऊस तोडणी यंत्रणा अपुरी आहे.
सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक १९ लाख मे.टन गाळपसर्वाधिक ३६ साखर कारखाने सोलापूर विभागात सुरू झाले असून गाळपही सर्वाधिक १९ लाख मेट्रिक टन झाले आहे. कोल्हापूर विभागातील १८ कारखान्यांनी ८ लाख, औरंगाबाद विभागातील १९ कारखान्यांचे साडे आठ लाख, नांदेड विभागातील २४ कारखान्यांचे १२ लाख, अहमदनगर विभागातील १७ कारखान्यांचे १२ लाख, पुणे विभागातील २१ कारखान्यांनी साडेसतरा लाख तर अमरावती विभागातील दोन कारखान्यांचे सव्वा लाख ऊस गाळप झाले आहे. राज्यातील २१७ साखर कारखान्यांनी ऊस गाळप परवान्यासाठी अर्ज केले असून आतापर्यंत १८४ कारखान्यांना साखर आयुक्त कार्यालयाने गाळप परवाना दिला आहे.