राजाराम लोंढे
कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत यंदा उसाचे पीक चांगले आहे. त्यात सप्टेंबर महिन्यात ऊन-पाऊस सुरू असल्याने वाढ जोमात सुरू असून, गेल्या वर्षीपेक्षा उसाच्या उत्पादनात वाढ होणार, हे निश्चित आहे.
दोन्ही जिल्ह्यांतील साखर कारखान्यांकडील ऊस नोंदीची आकडेवारी पाहिली तर २ कोटी ५४ लाख टन गाळप होईल, असा अंदाज असून, गेल्यावर्षी पेक्षा निश्चितच वाढ होणार आहे.
राज्य सरकारने १५ ऑक्टोबरपासून गाळपाला परवानगी दिली तरी दीपावली आणि त्यानंतर विधानसभेचे मतदान पाहिले तर हंगाम १५ नोव्हेंबर नंतरच गती घेणार आहे.
कोल्हापूर विभागात गेल्या हंगामात ४० सहकारी व खासगी कारखान्यांनी २ कोटी ४० लाखांपर्यंत उसाचे गाळप केले होते. यंदा मान्सून वेळेवर सुरू झाला.
त्यात महापुरामुळे फारसा फटका बसलेला दिसत नसून वाढ चांगली आहे. साधारणत: १ लाख ८६ हजार ९०५ हेक्टर उसाची नोंद कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांकडे झाली आहे.
सरासरी हेक्टरी ७५ टन उत्पादनानुसार १ कोटी ४० लाख टन तर सांगली जिल्ह्यात १ लाख ३७ हजार १०३ हेक्टरवरील उसाची नोंद असून, त्यांचा सरासरी हेक्टरी उतारा ८३ टन असून, त्यांच्याकडे १ कोटी १४ लाख ५५ हजार टन उसाची उपलब्धता आहे.
उत्तर कर्नाटकमधील उसाची उपलब्ध कमी असल्याने कर्नाटक सरकारने १५ नोव्हेंबरनंतर हंगाम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचा फायदा सीमाभागातील कारखान्यांना होऊ शकतो.
सीमाभागातील कारखाने सुरू होण्यापूर्वी उसाची मोठ्या प्रमाणात पळवापळवी व्हायची. ती थांबणार असली तरी महाराष्ट्रातील कारखान्यांच्या हंगामाला १५ नोव्हेंबर नंतरच गती येणार आहे.
अशी आहे जिल्हानिहाय उसाची उपलब्धता हेक्टर
जिल्हा | आडसाली | पूर्वहंगामी | सुरु | खोडवा | एकूण |
कोल्हापूर | २६,१६७ | ४१,३७४ | ३५,४०५ | ८३,९५७ | १,८६,९०३ |
सांगली | ४७,०६३ | १८,६८४ | १५,२०२ | ५६,१५२ | १,३७,१०१ |