Join us

मक्याच्या कणसाला दाणे नसल्याने केलेला खर्चही निघेना, रब्बीच्या पेरणीची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 3:00 PM

पावसाच्या दीर्घ खंडामुळे खरीप मक्याच्या उत्पादनात घट

मागील काही वर्षांपासून वैजापूर तालुक्यातील शिऊर परिसरात मक्याच्या पेऱ्यात मोठी वाढ झाली आहे. यावर्षी पेरणीयोग्य क्षेत्रापैकी ४० टक्के क्षेत्रावर मक्याची पेरणी झाली; परंतु, पिके बहरात आली असताना पावसाने दडी दिल्याने उत्पादन कमालीचे घटले आहे. सध्या मका पिकाची यंत्राद्वारे मुरघासासाठी कुटी करून १,७०० रुपये टनाप्रमाणे विक्री होत आहे. तर मक्याच्या कणसाला दाणे नसल्याने केलेला खर्चही निघत नाही, यामुळे रब्बीची पेरणीचीही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

अलीकडच्या काळात शिऊर परिसरात मका पीक प्रमुख बनले आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात मक्याचा पेरा झाला होता. मागील दोन ते तीन वर्षात उत्पन्न बऱ्यापैकी मिळाल्याने मका पेरणी जास्त केली. मात्र, सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारल्यामुळे पिके वाया गेली. आता तरझालेला खर्चही निघाला नाही.- बाबासाहेब बोर्डे, शेतकरी, हिलालपूर

शिऊर परिसरात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी खरीप हंगामात पाऊस तब्बल एक ते दीड महिना उशिराने झाला. यामुळे मका व इतर पिकांच्या पेरण्याही उशिराने झाल्या. दरम्यान, रिमझिम पाऊस पडत गेला अन् पिके जोमाने वाढली; परंतु, जुलैअखेर व संपूर्ण ऑगस्ट महिना अशी एक ते दीड महिना पावसाने दडी दिली. यामुळे जोमात आलेल्या मका पिकांचे नुकसान झाले असून कणसांमध्ये दाणे भरलेच नाहीत.

४० ते ४५ दिवसांच्या खंडामुळे शिऊर परिसरातील पिके करपून गेली. सप्टेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली. खरीप हंगामाला जीवनदान मिळाले. मात्र, परिसरातील पिके तोपर्यंत करपून गेली होती. यामुळे अल्प कालावधीतच पिके काढणीस आली. सध्या मका काढणीचे काम वेगात सुरू असून मिळणारे उत्पन्न पाहता केलेला खर्चही पदरात पडत नसल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे. मक्याच्या एका बॅगमागे ४ ते ५ क्विंटल उत्पन्न मिळत आहे. यात खर्चही निघत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

एक एकर मक्याला येणार अंदाजे खर्च

बियाणे खर्च १४५०डीएपी खत ३०००मजुरी ५०००औषध फवारणी २०००मशागत खर्च ४०००एकूण खर्च १५४५०

टॅग्स :शेतकरीरब्बीपीक