धोम बलकवडी धरणाच्या कालव्याला दोन महिने पाणी सोडले नसल्याने रब्बी हंगामातील पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. त्यामुळे धोम-बलकवडी कालव्याला त्वरित पाणी सोडा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे. भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील आंबवडे व वीसगाव खोऱ्यातून पूर्वेकडे गेलेल्या धोम-बलकवडी उजवा कालव्याला डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात आर्वतन सोडले जाते. मात्र, मागील दोन महिन्यांपासून कालवा कोरडा ठाणठणीत पडला आहे. यामुळे रब्बी हंगामातील पिके कालव्याच्या पाण्याअभावी सुकून चालल्याने कालव्याच्या आवर्तनाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. पाणी सोडलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असून, आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
वीसगावच्या नेरे, खानापूर, तर चाळीसगाव खोऱ्यातील आंबवडे परिसरातील शेतकऱ्यांची धोम बलकवडी उजव्या कालव्याच्या आवर्तनावरती दरवर्षी रब्बी पिके अवलंबून असतात. मात्र, यंदा रब्बीतील बाजरी, ज्वारी, हरभरा, गहू, करडई आणि इतर पिके सुरुवातीच्या काळात चांगली आली होती. सध्या मागील पंधरा दिवसांपासून पिकांना पाण्याची आवश्यकता असतानाही कालव्याला आवर्तन सोडले गेले नसल्याने पिके सुकून चालली आहेत. शेतकरी वर्ग पिकांचे हाल पाहून चिंताग्रस्त झाला आहे.
भोजापूर धरणातून पहिल्यांदा महिनाभर आवर्तन, दुष्काळी स्थितीत जमीन भिजली!
सध्या एकपण आवर्तन सुटले नाही. दरवर्षी आतापर्यंत दोन आवर्तन डिसेंबर व जानेवारी सुटते; मात्र दोन्ही सुटले नाही. ओढे-नाले कोरडे पडले असून, पिके सुकून गेली आहेत. कालव्याला पाणी सुटले नाही तर पिण्याच्या पाण्याची अवस्था बिकट होणार आहे. पाणी सोडले नाही तर शेतकरी आंदोलन करणार आहेत.- प्रकाश म्हस्के, शेतकरी पळसोशी
येत्या काही दिवसात सुरु होणार यात्रा हंगाम
खरिपातील पिके जोमात येऊन शेतकऱ्यांना उत्पन्न चांगले मिळाले आहे. त्याप्रमाणेच रब्बी पिकांना पाणी मिळाले तर रब्बी पिके ही जोमात येऊन उत्पन्नात वाढ होणार असल्याची आशा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. धोम-बलकवडी धरणाच्या उजव्या कालव्याला पहिले आवर्तन सोडले नाही. त्यामुळे ओढेनाले कोरडे पडले असून, जनावरांना पिण्यास पाणी नाही. आवर्तन सुटले नाही, तर पिण्याच्या पाण्याच्या योजना धोक्यात येतील आणि भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. काही दिवसांत यात्रा हंगाम सुरू होणार असून, पाण्याची कमतरता भासणार आहे. त्यामुळे पाणी सोडले तर रब्बीतील पिकांना फायदा होण्याबरोबरच कालव्याच्या खालील भागातील ओढे-नाले तसेच विहिरींना पाण्याचे स्रोत वाढणार आहेत. लवकरात लवकर कालव्याचे पहिले आवर्तन सोडावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. मात्र, पाणी सोडले नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.