पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा बुधवारी पहाटे सपत्नीक पार पडली. मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अहिरे दाम्पत्याची निवड करण्यात आली. बुधवारी पहाटे २.२५ वाजता शासकीय महापूजेला सुरुवात झाली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी लता शिंदे, मानाचे वारकरी बाळू शंकर अहिरे व आशाबाई बाळू अहिरे, रा. अंबासन, ता. सटाणा, जि. नाशिक यांच्या हस्ते महापूजा पार पडली.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री सुरेश खाडे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, वृषाली शिंदे, आ. समाधान आवताडे, आ. राणा जगजीतसिंह पाटील आदी उपस्थित होते.
आषाढी एकादशीनिमित्तपंढरपूरचे वातावरण भक्तीमय झाले असून सर्वजण पांडुरंगाच्या भक्तीमध्ये भान हरपून गेलेले आहेत. हे बा… विठ्ठला माझ्या बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे, प्रत्येकाचे दुःख दूर करण्याचे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.
शेतकरी श्री. बाळू शंकर अहिरे, (वय ५५ वर्षे) व सौ. आशाबाई बाळू अहिरे (वय ५० वर्षे) मु. पो. अंबासन, ता. सटाणा जि. नाशिक या मानाच्या वारकरी दाम्पत्याचा सत्कार मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केला. यावेळी एसटी महामंडळाकडून मानाच्या वारकऱ्यांना १ वर्ष मोफत एसटी बस सवलत पास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. हे मानाचे वारकरी मागील १६ वर्षांपासून नियमितपणे वारी करत आहेत.
१६ वर्षांचे परिश्रमाचे फळआषाडी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाच्या शासकीय महापुजेवेळी मानाचे वारकरी म्हणून दर्शन रांगेतून भाविकाची निवड केली जाते. यंदाच्या वर्षी हा मान बाळू अहिरे व आशाबाई अहिरे यांना मिळाला, अहिरे है पती-पत्नी मागील २६ वर्षापासून विठुरायाची यात्रा फरीत आहेत.