ज्योतिराम शिंदे
पंढरपूर : आषाढी यात्रा सोहळ्यासाठी देशभरातून किमान १५ लाख भाविक येत असतात. याशिवाय आषाढ महिन्यामध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज दोन लाख भाविक येतात. दर्शनानंतर यात्रेसाठी आलेल्या महिला भाविक आपल्या घराकडे परत जात असताना कुंकू, बुक्का, अष्टगंध, चंदनाची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात.
यामुळे येथील व्यापाऱ्यांनी जवळपास २०० टन कुंकवाची निर्मिती करून ठेवली आहे. यातून अंदाजे पंधरा ते वीस कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. पंढरपुरात भरणाऱ्या यात्रा सोहळ्यांपैकी आषाढी यात्रा सोहळा सर्वांत मोठा सोहळा असतो.
या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब, आंध्र प्रदेश आदी राज्यासह देश- परदेशातील भाविक दाखल होतात. या होणाऱ्या गर्दीचा व्यावसायिक उलाढालीसाठी वापर करतात. यात्रा सोहळ्यासाठी आलेले भाविक कपडे, शोभेच्या वस्तू, देवदेवतांचे फोटो, मूर्ती आदी साहित्यासह कुंकू, बुक्का, अष्टगंध, चंदन आदी प्रासादिक साहित्य मोठ्या भक्तिभावाने घरी घेऊन जात असतात.
यासाठी प्रदक्षिणा मार्ग, दर्शन मंडप, स्टेशन रोड परिसर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, ६५ एकर पालखी तळ व पंढरपूर-फलटण या प्रमुख पालखी मार्गावर शेकडो लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी प्रासादिक साहित्याची दुकाने थाटली जातात, तसेच यात्रा काळात चांगल्या मिळकतीची अपेक्षा ठेवत अनेक व्यापाऱ्यांसह राज्यभरातील प्रासादिक साहित्य विकणारे व्यावसायिक पंढरपुरात दाखल झाले आहेत.
वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने लावला जातो कुंकवाचा डोंगर
भाविकांना आकर्षित करण्यासाठी बनविलेले कुंकू मोठमोठ्या परातीत साधारण आठशे ते एक हजार किलोचे ढीग बनवून ठेवण्यात येतात. याला पंढरपुरी भाषेत 'परात लावणे' असे म्हणतात. पंढरपूरचे हे कुंकू वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने परातीत लावले जाते. ग्राहक आल्यानंतर या डोंगरातील कुंकू भाविकांना दिले जाते. कोणत्याही दुकानात गेला तरी कुंकू लावण्याची पद्धती डोंगरासारखीच दिसून येते. यातील कुंकू काढून भाविकांना देताना हा उंच डोंगर कोसळणार नाही, याची खबरदारी विक्रेत्यांकडून घेतली जाते.
तुळशी किंवा लाकडाच्या भुशापासून बुक्क्याची निर्मिती
कुंकवाप्रमाणेच अष्टगंध, गुलाल आणि बुक्क्याला वारकरी संप्रदायात महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. चांगल्या प्रतीच्या बुक्क्याची निर्मिती करण्यासाठी तुळशी अथवा इतर लाकडाच्या भुश्याचा वापर केला जातो. दुसऱ्या दर्जाच्या बुक्क्यासाठी कोळश्याच्या भुकटीचाही वापर केला जातो.
पिंजर कुंकवाला मोठी मागणी
वर्षभर कुंकवाची निर्मिती करूनही येथील कुंकू अपुरे पडत असल्याने इतर राज्यातूनही कुंकवाची आयात करावी लागते. मात्र, कुंकू खरेदी करताना चोखंदळ भाविक हळदीपासून बनविलेल्या म्हणजेच पिंजर कुंकवाला अधिक पसंत देत असतात. यामुळे हे कुंकू पंढरपूरमध्येच बनविले जाते. याला पहिल्या दर्जाचे कुंकू म्हणतात.