सद्यस्थितीत हवामान बदल त्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी पाऊस पडत आहे. आणखी काही दिवस वातावरणात असे बदल होत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन घाटे भरण्याच्या अवस्थेमधील हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव होत आहे, शिवाय तुरीलाही ढगाळ वातावरण बाधक असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
रब्बी हंगामात जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रावर हरभरा पिकाची लागवड करण्यात आली आहे. नोव्हेंबरमधील अवकाळी पावसामुळे जमिनीत ओलावा वाढल्याने हरभऱ्याचे पेरणी क्षेत्र वाढले आहे. खरिपात पावसाच्या तुटीमुळे उत्पादनात घट आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मदार रब्बी पिकांवर आहे.
अधिक वाचा: ज्वारी पिकातील कीड व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन
एकात्मिक व्यवस्थापन महत्त्वाचे
- घाटे अळीचे परभक्षक पिकातील अळ्या वेचून खातात. त्यामुळे कीटकनाशकाचा जास्त वापर टाळावा. शेतामध्ये हेक्टरी २० ते २५ पक्षीथांबे उभारावेत.
- कामगंध सापळ्याचा वापर करावा, एकरी किमान दोन कामगंध सापळे लावावे.
असे मिळवावे नियंत्रण
- अळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पहिली फवारणी ५० टक्के पीक फुलोऱ्यावर असताना निंबोळी अर्क ५ टक्के किंवा एचएएनपीव्ही ५०० एनई हेक्टरी किंवा क्वीनॉलफॉस २५ ई.सी.२० मिलीची फवारणी करावी.
- पहिल्या फवारणीच्या १५ दिवसांनंतर दुसरी फवारणी इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के एसजी ४ ग्रॅम किवा इथिऑन ५० टक्के ईसी २५ मिली किंवा इंडोक्झाकार्ब १५.८० इसी ६.६ मिली किंवा लॅबडा सायहेलोथ्रीन ०.५ इसी १० मिली ही फवारणी करावी, असा सल्ला जळगाव जामोद कृषी विज्ञान केंद्रातील कीटक शास्त्रज्ञ अनिल गाभणे यांनी दिला.