नाशिक : मागच्या तीन महिन्यांपासून कांदा निर्यातबंदी असल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. तर केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आपला सोन्यासारखा कांदा मातीमोल दराने विक्री करावा लागत आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ३१ मार्चपर्यंत बंदी घातली असून मुदतीआधीच निर्यात कोणत्याही अटीशिवाय खुली करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
दरम्यान, नाशिक येथील शेतकरी आणि कलाकार असलेल्या किरण मोरे आणि प्रगतशील शेतकरी केशव सुर्यवंशी यांनी स्वखर्चाने एक कांदा चित्ररथ तयार केला असून ते हा रथ गावोगावी फिरून या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे दुःख मांडत आहेत. तर 'सरकार नेहमी आमच्यावरच अन्याय का करते?' असा सवालही त्यांनी या माध्यमातून सरकारला केला आहे.
केंद्र सरकारने कांदा पिकाला राजकीय वनवास घडवला आहे. त्यामुळे या सरकारला आता अद्दल घडविण्यासाठी वेळ आली आहे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकीत कांदा उत्पादकांवर अन्याय करणाऱ्या सरकारला मतदान बंदी हे या रथाचे मूळ स्वरूप असल्याचं मोरे यांनी सांगितलं.
काय आहे कांदा चित्ररथाचे स्वरूप?या चित्ररथामध्ये जवळपास पाच ते सहा फूट उंचीची कांद्याची प्रतिकृती आहे. त्याचबरोबर या कांद्यावर केंद्र सरकार असं लिहिलेला बोर्ड असून केंद्र सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या मानगुटीवर बसलेले आहे असं त्यांना सुचवायचे आहे. त्याचबरोबर चित्ररथाच्या चारही बाजूने बोर्ड लावण्यात आलेले असून त्यामध्ये कांद्याचा उत्पादन खर्च दाखवण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांवर कसा अन्याय होतोय हेही या रथामध्ये मोरे यांनी दाखवलं आहे.
आम्ही अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ अशा संकटातून कांदा कसाबसा वाचवला. वाटत होते की, सरकार आमच्या संकटरुपी जखमेवर फुंकर घालून शासकीय योजनेची मलमपट्टी करणार पण तसे न करता सरकारने कांदा निर्यात बंदीची कुऱ्हाड मारली आणि आमच्या जखमेवर मीठ चोळले. म्हणून आता या जाहिरातबाजी करणाऱ्या सरकारला त्यांच्याच पद्धतीने उत्तर देण्यासाठी मी माझ्या स्वखर्चाने हा कांदा चित्ररथ काढला आहे.- किरण मोरे (कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यंगचित्रकार)