Join us

हवामान, खरिपातील पीक पद्धतीबाबत कृषी महाविद्यालयाकडून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 12:09 AM

विभागीय विस्तार केंद्र व ग्रामीण कृषी मौसम सेवा प्रकल्पाअंतर्गत मौजे शेळकेवाडी, ता. मुळशी येथे शेतकरी मेळावा संपन्न 

पुणे : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पुण्यातील कृषी महाविद्यालयाकडून पुण्यातील मुळशी येथील शेतकऱ्यांना हवामान आणि यंदाच्या खरिपातील हवामान अंदाजाबद्दल माहिती देण्यात आली. कृषी महाविद्यालय, पुणे येथील विभागीय विस्तार केंद्र, कृषी हवामानशास्त्र विभाग व भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मुळशी तालुक्यातील मौजे शेळकेवाडी पिंपळोली येथे शेतकरी मेळावा व प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यादरम्यान ग्रामीण कृषि मौसम सेवा प्रकल्पाची माहिती व त्या प्रकल्पाद्वारे राबविण्यात येणाऱ्या  विविध उपक्रमांची माहिती कृषी हवामानशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजय स्थूल यांनी दिली. 

शेतकऱ्यांनी भारतीय हवामानशास्त्र विभाग व भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने एकत्र येत पर्जन्य पूर्वानुमान सल्ल्याकरिता विकसित केलेल्या मेघदूत या ॲप बद्दलची तसेच भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था व भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने एकत्र येऊन वीज कोसळण्याचा अचूक अंदाज वर्तविणाऱ्या दामिनी या ॲपची माहिती श्री. सुहास जाधव यांनी दिली. श्री. महेंद्र चौधरी, हवामान शास्त्रज्ञ, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे यांनी यंदाचे वर्षीचे खरीप हंगामातील हवामान अंदाजाबद्दल माहिती दिली. 

कृषी संशोधन केंद्र वडगाव मावळ येथील प्रमुख भात शास्त्रज्ञ डॉ. नरेंद्र काशीद यांनी भात रोपवाटिका व्यवस्थापन, भाताची पुनर्लागण व खत व्यवस्थापन याबाबत सखोल मार्गदर्शन केले. विभागीय विस्तार केंद्र, कृषी महाविद्यालय, पुणे येथील पीक संरक्षण शास्त्रज्ञ डॉ. विकास भालेराव यांनी भात पिकासाठी बीज प्रक्रिया व भातावरील रोग व किडींचे एकात्मिक नियंत्रण याबद्दल माहिती सांगितली.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेल्या सल्ल्याप्रमाणे भाताचे उत्पादन घेतल्याने झालेली उत्पादन वाढ व भात शेतीमध्ये झालेले इतर चांगले बदल याबद्दल श्री. नवनाथ शेळके, श्री. अविनाश शिंदे व श्री. सुनील कडू या शेतकऱ्यांनी उपस्थितांबरोबर आपले अनुभव कथन केले. कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांच्या भात रोपवाटिकांना भेटी देण्यात आल्या व महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाप्रमाणे तयार केलेल्या रोपवाटिका व पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या रोपवाटिका यातील फरक व फायदे अधोरेखित करण्यात आले. या शेतकरी मेळाव्याचा लाभ शेळकेवडी - पिंपळोली, कातरखडक व जवळ या गावांतील शेतकऱ्यांनी घेतला. या कार्यक्रमामध्ये उपस्थित शेतकऱ्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाची 'कृषी दर्शनी २०२४' देण्यात आली.

मौजे शेळकेवाडी येथील विविध उपक्रमांना मा. कर्नल डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांचे पाठबळ लाभते. कार्यक्रमास राहुरी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, संचालक, विस्तार शिक्षण डॉ. श्रीमंत रणपिसे, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासळकर व विभागीय विस्तार केंद्राचे विस्तार कृषिविद्यावेत्ता डॉ. सोमनाथ माने यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे आयोजनाकरिता विभागीय विस्तार केंद्र, पुणे चे डॉ. मृणाल अजोतीकर व डॉ. विकास भालेराव तर ग्रामीण कृषी मौसम सेवेच्या श्री. सुहास जाधव व श्री. दादासाहेब लोखंडे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विकास भालेराव यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. मृणाल अजोतीकर यांनी केले.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी