Join us

समतोल आहारात छोट्या बियांसह तृणधान्याची जनजागृती 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2024 4:18 PM

सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा ''राष्ट्रीय पोषण सप्ताह'' म्हणून साजरा केला जातो यात तृणधान्याची माहिती दिली जाते.

अनिल गवई

कुपोषणासोबतच संतुलित आहाराबाबत जनजागृतीच्या उद्देशाने देशभरात एकाचवेळी राबविल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पोषण मासात यंदा तृणधान्य आणि कमी आकारातील बियांच्या समूहातील धान्य वापरावर भर दिला जात आहे. 

यंदाच्या पोषण मासाची संकल्पना तृणधान्य असून त्यापासून निर्मित पदार्थांचा आहारात समावेश करण्यासाठी जनजागृती सुरू आहे. देशातील कुपोषण कमी करण्यासोबतच समतोल आहाराबाबत माहिती देण्यासाठी शासनस्तरावरून सन २०१८ पासून दरवर्षी संपूर्ण सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषण माह म्हणून साजरा केला जात आहे.

तत्पूर्वी सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा ''राष्ट्रीय पोषण सप्ताह'' म्हणून साजरा केला जात होता. यामध्ये ० ते ६ वयोगटातील बालके, महिला आणि स्तनदा माता यांच्या आहाराबाबत जनजागृती केली जात होती. 

मात्र, सन २०१८ पासून या सप्ताहाला व्यापक स्वरूप देत पोषण आहार संकल्पना राबविली जात आहे. यात भरपूर प्रोटिनयुक्त वनस्पतींमध्ये सुरण, मशरूमसारख्या भाज्यांचे महत्त्व व त्यांचे उपयोग सांगितले जातात.

तृणधान्यांचा वापर वाढला! 

गेल्या काही वर्षांत तृणधान्यांसोबतच विविध कडधान्यांचा आहारात समावेश वाढला आहे. सोबतच नैसर्गिक तसेच सेंद्रीय धान्याच्या वापराबाबत समाजमन जागृत झाले आहे. याशिवाय होलगी, बारली, बाजरी, नाचणी, सावा यासारख्या तृण आणि धान्याचा वापर वाढल्याचे दिसून येते.

बाजरी, नाचणीची बिस्किटे

तृणधान्य नाचणी, बारली, होलगी आणि साव्यापासून तयार केलेल्या बिस्किटांची मागणी गेल्या काही वर्षात वाढली आहे. इतकेच नव्हे तर उपवासासाठी भगर या तृणधान्यांचीही बिस्किटे तयार केली जात आहेत. रानभाज्या आणि त्यांच्या वापराची माहिती, त्यांच्यापासून विविध पदार्थ जसे बिस्कीट, पिठले आदी पदार्थाची माहिती सप्ताहात दिली जात आहे.

समतोल आहाराच्या जनजागृतीसाठी पोषण माह साजरा केला जातो. भरपूर प्रथिनेयुक्त धान्याच्या वापरावर या सप्ताहात भर दिला जातो. यंदा मिलेट्स ही संकल्पना राबवून पोषण माह साजरा केला जात आहे. -पुजा तेरेदेसाई, आहार तज्ज्ञ, खामगाव 

टॅग्स :शेती क्षेत्रफळेभाज्याशेतकरीशेती