इ.स. २०१८ ते २०२२ या काळात भारतातील शेतजमिनीवरील ५० लाख झाडे नष्ट झाली आहेत, असे 'नेचर सस्टेनॅबिलिटी' या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या नव्या संशोधनात म्हटले आहे. बदललेल्या शेती पद्धतीमुळे या झाडांवर कुऱ्हाड कोसळल्याचे अहवालात नमूद केले आहे.
संशोधकांनी म्हटले आहे की, वनशेतीची जागा भातशेती घेत आहे. भातशेतीसाठी जमीन उपलब्ध व्हावी म्हणून मोठी झाडे तोडली. झाडे आता केवळ ठराविक क्षेत्रातच (ब्लॉक प्लॅटेशन) वाढवली जात आहेत. अशा झाडांचे पर्यावरणीय मूल्य अत्यल्प आहे. ब्लॉक प्लँटेशनमध्ये झाडांच्या मोजक्याच जाती जोपासल्या जातात. तेलंगणा, हरियाणा, महाराष्ट्र आणि अन्य काही राज्यांतील शेतकऱ्यांनी मुलाखतीत ही माहिती दिली.
सावलीमुळे फटका
डेन्मार्कमधील कोपेनहेगेन विद्यापीठातील संशोधकांनी सांगितले की, कमी आर्थिक लाभ असलेली आणि सावलीमुळे पिकांना अपाय करणारी लिंबासारखी झाडे नव्या पद्धतीत जमिनीवरून काढली जात आहेत.
त्यामुळे भात लागवडीखालील क्षेत्र वाढले तसेच उत्पादनातही वाढ झाली. नवीन बोअरवेलमुळे पाण्याची सुविधा वाढली. वास्तविक या झाडांचे सामाजिक-पर्यावरणीय लाभ आहेत. ही झाडे हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषण्याचे मोठे काम करतात.