Lokmat Agro >शेतशिवार > दुष्काळी भागात पावसाची पाठ; टंचाईत वाढ

दुष्काळी भागात पावसाची पाठ; टंचाईत वाढ

Back of rain in drought areas; Increase in scarcity | दुष्काळी भागात पावसाची पाठ; टंचाईत वाढ

दुष्काळी भागात पावसाची पाठ; टंचाईत वाढ

सद्यस्थितीत सातारा जिल्ह्यातील ८२ गावे आणि ४०४ वाड्यांच्या घशाला कोरड पडली असून, त्यासाठी ८६ टँकर सुरू आहेत. त्यातच पावसाची स्थिती पाहता टंचाईत वाढ होणार आहे.

सद्यस्थितीत सातारा जिल्ह्यातील ८२ गावे आणि ४०४ वाड्यांच्या घशाला कोरड पडली असून, त्यासाठी ८६ टँकर सुरू आहेत. त्यातच पावसाची स्थिती पाहता टंचाईत वाढ होणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नितीन काळेल
पावसाळा संपत आला तरी अजूनही जिल्ह्यातील बहुतांशी भागात दमदार पाऊस पडलेला नाही. त्यामुळे दुष्काळी भागात पाण्याचा ठणठणाट असून, टंचाईतही वाढ झाली आहे. सद्यस्थितीत सातारा जिल्ह्यातील ८२ गावे आणि ४०४ वाड्यांच्या घशाला कोरड पडली असून, त्यासाठी ८६ टँकर सुरू आहेत. त्यातच पावसाची स्थिती पाहता टंचाईत वाढ होणार आहे.

जिल्ह्यात २०१७-१८ साली दुष्काळी स्थिती होती. त्यावेळी जवळपास २०० हून अधिक गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. मात्र, मागील चार वर्षांत पर्जन्यमान चांगले झाले. त्यामुळे टंचाईची स्थिती फारशी उद्भवली नाही. मार्च-एप्रिलमध्ये टँकर सुरू झाला तरी जूनपर्यंत तो सुरू राहायचा. मात्र, यंदा टंचाईची परिस्थिती गडद आहे. सप्टेंबर महिना सुरू झाला तरी जिल्ह्याच्या बहुतांशी भागात चांगला पाऊस झालेला नाही. पूर्व भागात कायम प्रतीक्षा असून, पश्चिमेकडेच बऱ्यापैकी पाऊस पडला आहे. त्यामुळे पश्चिमेकडे पाण्याची टंचाई नाही. मात्र, पूर्व भागातील माण, खटाव, फलटण आणि कोरेगाव या तालुक्यांत टंचाई वाढू लागली आहे.

जिल्ह्यातील माण तालुक्यात भयावह स्थिती आहे. एकूण ४७ गावे आणि ३४३ वाड्यांना ६० टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या टँकरवर सुमारे ७५ हजार नागरिक आणि ६१ हजार पशुधनाची तहान अवलंबून आहे. तालुक्यात पांगरी, वडगाव, बिजवडी, मोगराळे, पाचवड, अनभुलेवाडी, राजवडी, मोही, थदाळे, डंगिरेवाडी, वावरहिरे, रांजणी, पळशी, पिंपरी, भालवडी, खुटाबा, मार्डी, खुटबाव, पर्यंती, वारुगड, परकंदी, पांढरवाडी, उकिर्डे, पिंगळी बुद्रुक, सुरूपखानवाडी, कुरणेवाडी आदी गावांसह वाड्यांवर पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे टँकर सुरू करण्यात आले आहेत.

खटाव तालुक्यातही टंचाई वाढू लागली आहे. त्यामुळे सध्या १९ गावे आणि २४ वाड्यांसाठी टँकर सुरू आहे. तालुक्यातील २६ हजार नागरिक आणि साडेसात हजार जनावरांना १२ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. मांजरवाडी, मोळ, गारवडी, नवलेवाडी, मांडवे, गोसाव्याचीवाडी, कणसेवाडी, खातवळ, येलमरवाडी, पडळ, कान्हरवाडी, धोंडेवाडी आदी गावांसह इतर वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. फलटण तालुक्यातही टंचाई आहे. ८ गावे आणि ३७ वाड्यांसाठी १० टँकर सुरू आहेत. या टँकरवर १३ हजार ८२५ नागरिक आणि १४ हजारांवर जनावरांची तहान अवलंबून आहे. सासवड, दुधेबावी, वडले, मिरगाव, आरडगाव, आंदरूड, चांभारवाडी, घाडगे मळा आदी ठिकाणी टंचाई निवारणासाठी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.

कोरेगाव तालुक्यातही ६ गावांमध्ये टंचाई आहे. यासाठी ३ टँकर सुरू करण्यात आले आहेत. चवणेश्वर, होलेवाडी, विखळे, फडतरवाडी येथे टंचाई असून, साडेतीन हजार नागरिक आणि दोन हजार पशुधनाला पाणी पुरवठा केला जात आहे.

सव्वा लाख नागरिक; ८५ हजार पशुधन विळख्यात
- जिल्ह्यात टंचाईची स्थिती वाढत चालली आहे. त्यामुळे आज पाच तालुक्यांतील १ लाख १९ हजार ६६० नागरिक आणि ८५ हजारांवर पशुधनाला टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
- सर्वाधिक टंचाई माण तालुक्यात आहे. टंचाई निवारणासाठी शासकीय ७ आणि खासगी ७७ टँकर सुरू आहेत. तर २० विहिरी आणि ३३ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

Web Title: Back of rain in drought areas; Increase in scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.