नितिन कांबळे
जिवापाड जपलेली ५ एकरांतील केळीची बाग अवकाळी पावसामुळे भुईसपाट झाली. अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे जवळपास २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून अद्याप पाहणी व पंचनामा करण्यात आला नसल्याने शेतकरी हताश झाला आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सांगवी आष्टी येथील रमेश गायकवाड यांनी जून न २०२३ मध्ये पाच एकरात केळीची बाग लावली होती. बागेवर आजवर आठ लाख रुपये खर्च केला. उन्हाळ्यात न टँकरने विकतचे पाणी घालून बाग जिवंत ठेवली.
मोठ्या प्रमाणात फळ आल्याने दहा दिवसांत तोडणी करून ते विक्रीसाठी पाठवायचे होते; पण शनिवारी सायंकाळी झालेल्या न अवकाळी पावसाने पाच एकरांतील बाग भुईसपाट झाली. यात एकरी पाच लाखांचे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
मोठे नुकसान होऊनदेखील प्रशासनाने या भागात पाहणी केली नाही. प्रशासनाने पंचनामा करून हातभार लावावा, अशी मागणी रमेश गायकवाड यांनी केली आहे. दरम्यान, आम्हाला वेळ नाही. आमच्याकडे निवडणुकीचे काम दिलेले आहे, असे तलाठ्यांनी सांगितले.
प्रशासनाकडून पंचनाम्याची मागणी
तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी फळबागांचे नुकसान झाले आहे. कुठे घरावरील पत्रे उडून संसार उघड्यावर पडले आहेत. कुठे फळबागांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा त्वरित पंचानामा करावा, अशी मागणी केली जात आहे.
हेही वाचा - Sericulture Farming रेशीम शेती करा अन् चार लाखांचे अनुदानही मिळवा