राजाराम लोंढे
कोल्हापूर : केंद्र सरकारने रासायनिक खताच्या अनुदानातून हात काढता घेतल्याने अगोदरच मिश्र खतांचे दर गगनाला भिडले आहेत. एकमेव स्वस्त असणाऱ्या युरियाच्या दरात वाढ न करता त्याच्या पोत्याचे वजन कमी करून दर तेवढाच ठेवला आहे. आता नवीन युरिया ४५ ऐवजी ४० किलो पोत्यातून येणार आहे. पूर्वी ५० किलोचे पोते २६६ रुपये ५० पैशांना होते, ते कमी करीत ४५ किलो करत तेवढ्याच दरात आता सल्फर कोटेड युरिया ४० किलो केला. पोत्याच्या वजनाच्या आडून युरियाच्या दरात आतापर्यंत २४ टक्क्यांची वाढ केली आहे.
दहा वर्षांपूर्वी केंद्र सरकार रासायनिक खतांना मोठ्या प्रमाणात अनुदान देत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दरात खत उपलब्ध झाल्याने उत्पादन खर्चात बचत व्हायची. पण, अलीकडे केंद्र सरकारने रासायनिक खते नियंत्रणमुक्त करून त्याचे दर ठरवण्याचे अधिकार खत कंपन्यांना दिले आहेत. त्यामुळे खत कंपन्यांची मनमानी सुरू झाली असून खतांचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत.
सर्वात स्वस्त खत म्हणजे युरिया आहे, पण केंद्र सरकारने हळूहळू वजन कमी करून दर तेवढाच ठेवला आहे. पहिल्यांदा ५० किलोचा युरिया २६६.५० रुपयांनी मिळत होता. त्यानंतर सरकारने ४५ किलोचे पोते आणले आणि दर तेवढाच ठेवला. आता ४० किलोचे पोते येणार असून दर मान्न २६६.५० रुपयेच राहणार आहे. त्यामुळे युरियाचे दर स्थिर ठेवत पोत्याचे वजन दहा किलोने कमी केले. त्यामुळे शेतकऱ्यांना पोत्यांमागे ६६.५० रुपये जादा मोजावे लागणार आहेत.
असे आहेत खतांचे दर
पोटॅश - ₹१७००
सुफर फॉस्फेट - ₹५५०
२०:२०:०:१३ - ₹१२५०
२०:२०:० - ₹१२००
१८:१८:१० - ₹१२००
१०:२६:२६ - ₹१४७०
१५:१५:० - ₹१४७०
युरियात १७% सल्फर
यापूर्वी युरियामध्ये ४६ टक्के नत्राचे प्रमाण होते. आता नवीन पॅकिंगमध्ये ३७ टक्के नत्र व १७ टक्के सल्फर (गंधक) चे प्रमाण राहणार आहे. हा युरिया पिकांना गरजेनुसार हळूहळू मिळू शकतो.
सेंद्रिय शेतीसाठीच सरकारचा अट्टाहास
रासायिक शेतीऐवजी सेंद्रिय शेतीकडे शेतकरी वळला पाहिजे, असा अट्टाहास सरकारचा आहे. त्यामुळेच रासायनिक खतांच्या किमती वाढवून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळवायचा प्रयत्न सुरू आहे.
केंद्र सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. एकीकडे उसाचे उत्पादन घटले आहे, दुसऱ्या बाजूला रासायिक खतांच्या किमती भरमसाट वाढवल्याने इतर पिकांचे उत्पादनही घटणार आहे. केंद्र सरकारला नेमके काय साध्य करायचे आहे, हेच कळत नसून स्वाभिमानी' या धोरणाविरोधात विरोध करणार आहे. - राजू शेट्टी, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना