नसीम शेख
बैलपोळा सणाला अद्याप २० दिवस अवकाश असला तरी लाडक्या सर्जा-राजाच्या साजासाठी तागवाले परिवाराचे हात मागील तीन महिन्यांपासून ठिकठिकाणी राबत आहेत. जालना जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील तिकटे परिवारातील सर्वजण सध्या सर्जा राजाचा हा साज बनवण्यात मग्न दिसत आहे. बळीराजासाठी महत्त्वाचा सण म्हणजे बैलपोळा होय.
या सणासाठी बळीराजा आपल्या लाडक्या सर्जा-राजासाठी वेळप्रसंगी पदरमोड करून साज खरेदी करीत असतो. आज बाजारात रेडीमेड साज मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध होत असला तरीही तागवाले परिवारजनांनी हाताने बनवलेल्या साजाची क्रेझ आजही कायम आहे. बैलपोळा सणाच्या जवळपास तीन महिने अगोदरपासून येथील श्यामराव तिकटे व त्यांच्या परिवारातील सर्वांचे हात सर्जा-राजाच्या साजासाठी राबत आहे.
सध्या या परिवारातील श्यामराव तिकटे, पत्नी सुमन तिकटे, मुले तुळशीदास तिकटे, भास्कर तिकटे, सुना सत्यभामा तिकटे, कमल तिकटे यांच्यासह नातवंडे सध्या या कामी पुढाकार घेत आहेत. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाचा पोळा सण सर्व शेतकरी आनंदाने साजरा करतात. या दिवशी बैलाला स्वच्छ पाण्याने धुवून अंघोळ घातली जाते. सायंकाळी त्याच्या अंगावर विविध साज घालवून सजवले जाते. या दिवशी शेतकऱ्यांत उत्साह असतो.
अगोदर बैलाचा हा साज तागापासून तयार केला जायचा. मात्र सध्या तागशेती कालबाह्य झाल्याने सुताच्या साहित्याला महत्त्व आले आहे. यासाठी आमचा परिवार चार-पाच महिन्यांपासून सुताचा धागा तयार करण्यासाठी कष्ट घेत असतो. बाजारात रेडीमेड साज मिळत असला तरीही अनेक शेतकरी हाताने बनवलेल्या साजाला पसंती देतात. बळीराजाच्या लाडक्या सर्जा-राजासाठी राबणाऱ्या आमच्या तागवाले समाजाच्या उन्नतीसाठी शासनाने विशेष प्रयत्न करावेत. - शामराव तिकटे साज कारागीर, टेंभुर्णी.
सुरत, जळगावहून मागवावा लागतोय सूताचा धागा
तिकडे परिवार सर्जा-राजासाठी जो साज हाताने तयार करतात, त्यामध्ये वेसण, ज्योते, कासरे, साधी मोरखी, गळ्यातील कांडके, शिंगातील सर, कवड्यामाळ, गळ्यातील गेठे, आवळा घोलमोरखी आदी साहित्याचा समावेश आहे. त्यासाठी सुरत, जळगाव, आदी ठिकाणांहून खास सूत धागा मागवावा लागतो.