पुराणकथांमध्ये महाबळी हा दैत्यांचा राजा आणि भक्त प्रह्लादाचा नातू म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचे वडील विरोचन आणि आई देवांबा होते. बळी राजा अष्टचिरंजीवींपैकी एक मानला जातो आणि त्याला दक्षिण भारतात एक आदर्श राजा म्हणून सन्मानित केले जाते. त्याची राजधानी महाबळीपुरम् अशी मानली जाते.
बळी राजा न्यायप्रिय, सद्वर्तनी, आणि प्रजाहितदक्ष शासक होता, जो महान विष्णूभक्तही होता. त्याने इंद्राला पराभूत करून स्वर्ग आणि पृथ्वीचे राज्य मिळवले, पण देवतांच्या मत्सरामुळे त्याला पाताळात जावे लागले. देवतांनी श्री विष्णूकडे याचना केली, तेव्हा त्यांनी बळीचा बळी घेण्यास नकार दिला. त्यानंतर, विष्णूने वामनावतार घेऊन बळीकडे तीन पाऊले भूमीचे दान मागितले, जे बळीने सहर्ष स्वीकारले.
तथापि, विष्णूने विराट रूप धारण करून केवळ दोन पाऊलांमध्ये पृथ्वी आणि स्वर्ग व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यासाठी जागा मागितल्यावर बळीने आपले मस्तक पुढे केले, त्यामुळे विष्णूने त्याला पाताळात पाठवले, तिथले राज्य दिले. बळीने वर्षातून एकदा पृथ्वीवर येण्याची अनुमती मागितली, ज्यामुळे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी असणाऱ्या बलिप्रतिपदेदिवशी तो आपल्या मूळ राज्याकडे येतो, अशी आख्यायिका आहे.
तर आजही "इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो" म्हणत महाराष्ट्राबरोबरच केरळात आणि तुळू प्रदेशातही महाबळीच्या स्वागतार्थ घरे सजवली जातात आणि अंगणात मोठमोठ्या 'पूकळम्' (फुलांच्या रांगोळ्या) काढण्याचा आणि दीपोत्सव करण्याचा प्रघात आहे. बळीच्या गौरवार्थ लोकगीते म्हणण्याचीही प्रथा काही भागात आहे.