Join us

आगामी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी पैशांची जुळवाजुळव करताना बळीराजाची कसरत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 8:43 PM

यंदा सर्वाधिक यंत्रिकीकरणाला प्राधान्य

गत काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. शेतात खरीपपूर्व मशागतीला वेग आला आहे. एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने शेती कामाला सोयीस्कर ठरत आहे, तर दुसरीकडे मात्र हंगामाकरिता पैशांची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागत असल्याची स्थिती सोनपेठ तालुक्यातील दिसून येत आहे.

एकीकडे उन्हाचा पारा ४० च्यावर गेला असताना रखरखत्या उन्हात बळीराजाचा संपूर्ण परिवार मशागतीच्या कामात गुंतल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे. यंदा मे महिन्यात जास्त लग्नतिथी नसल्याने आता लग्नसराई थंडावली आहे. त्यामुळे या वेळेचा उपयोग बळीराजा शेती मशागतीसाठी करीत असल्याचे दिसते.

परिसरात सध्या पहाटी उपटणे, कडबा गोळा करणे, शेणखत पांगविणे, शेतातील काडी कचरा जाळणे, ट्रॅक्टरद्वारे व्हिपास, नांगरणे, रोटाव्हेटर करणे आदी कामांनी वेग घेतला आहे.

गत खरीप व रब्बी हंगाम नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांना उत्पादनात मोठी घट सहन करावी लागली. त्यात १२ हजारांवर गेलेला कापूस यंदा ८ ते ८५०० रुपयांच्या पुढे सरकला नाही. सोयाबीन कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यानंतर थोडीफार आशा असलेला उन्हाळी हंगामसुद्धा गारपिटीने भुईसपाट केला. परिणामी, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

मात्र, यातून सावरत पुन्हा बळीराजा पुढील हंगामात आमदनी होईल ही आशा मनाशी बाळगून पुन्हा कामाला लागला आहे.

यांत्रिकीकरणाला प्राधान्य

यावर्षी अवकाळी पावसामुळे शेतजमीन नरम झाल्याने शेतकऱ्यांना सोयीचे झाले आहे, तर उन्हाचा पार वाढत असून, अनेक शेतकरी ट्रॅक्टरद्वारे नांगरणीला पसंती देत आहेत, तर कमी शेती क्षेत्र असलेले शेतकरी दोन बैलांद्वारे मशागतीवर भर देत आहेत.

गतवर्षी परिसरात दुष्काळासह अवकाळीने खरीप, रब्बी हंगामात नुकसान झाले. आता येणारा हंगाम तरी चांगला जाईल, अशी अपेक्षा आहे. तत्पूर्वी शासनानेही खते, बियाणे, औषधींच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवावे. - भगवान धबडे, शेतकरी.

खते, बियाणे खरेदीची तयारी

• खरीप हंगाम जवळ आला असून, शेतीपूर्व मशागतीची कामे वेगाने केली जात आहेत, तर दुसरीकडे खते, बी-बियाणे खरेदीची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. भाववाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन घरातच ठेवला होता.

• मात्र, पेरणी तोंडावर आली असताना नाइलाजास्तव शेतमाल कमी भावात विकून पेरणी तयारी करीत आहेत.

हेही वाचा - स्पर्धा परीक्षा सोडून माळरानात फुलविली फळबाग; मराठवाड्यात परदेशी फळांचा थाट

टॅग्स :शेतीशेतकरीखरीपपीक व्यवस्थापनशेती क्षेत्र