विविध योजना तर काही जाहिराती, फसवे दावे आदींतून अनेक शेतकरी बांधवांनी गेल्या दोन चार वर्षात मराठवाडा आणि विदर्भात मजुरांच्या समस्येला व नैसर्गिक बदलांना त्रस्त होऊन मोठ्या प्रमाणात बांबू लागवड केली. आता हे बांबू विक्री योग्य स्थितीत आहे. मात्र खरेदीदार मिळत नसल्याने अनेक शेतकरी बांबू उखडून टाकत आहे.
वेळेवर मजूर न मिळणे ही काय आजची समस्या नाही. त्यात दिवसेंदिवस वातावरणीय बदल वाढले आहेत. अलीकडे दोन चार दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी याचे उत्तम उदाहरण आहे. शेती करतांना या आणि अशा विविध समस्यांना कंटाळून अनेक शेतकरी कमी मशागतीची शेती करण्याकडे वळत आहे. ज्यात अनेकांनी फळबागांचा मार्ग अवलंबला आहे. तर काही शेतकर्यांनी बांबू लागवड केली आहे.
अगदी दहा ते शंभर रुपयांची रोपे, मशागत, लागवड, आदी खर्च करत तीन ते पाच वर्षांपासून शेतकरी बांबूंचे संगोपन करत आहे. ज्यातून अनेक शेतकरी बांबूंची योग्य आणि अपेक्षित वाढ करण्यात यशस्वी देखील ठरले आहे. लागवड करत्या वेळी मिळालेली माहिती उत्पनाचे आकडे यावरून झालेला खर्च वजा जाता चांगले उत्पन्न मिळण्याची या शेतकर्यांची अपेक्षा होती.
मात्र शेतकर्यांच्या या अपेक्षांचा भंग होतांना दिसून येत आहे. सध्या शेतात उभे असलेले बांबू खरेदी करण्यासाठी कोणी व्यापारी मिळत नसल्याने तसेच ज्या कंपन्यासोबत करार होते त्यांचा ही काही संपर्क होत नसल्याने बांबू उत्पादक शेतकर्यांसमोर संकट उभे राहिले आहे.
पाच वर्षांपूर्वी मध्य प्रदेशच्या एका कंपनी सोबत करार करून बांबु लागवड केली होती, आता बांबू काढणी ला आलेला आहे. मात्र कंपनीशी संपर्क होत नसल्याने पाच वर्षांचा खर्च, वेळ, मेहनत आदींचा विचार करता मोठे संकट समोर उभे राहिले आहे. - विशाल गायकवाड, शेतकरी, लोणार