Bamboo Farming :शेषराव शिरसाट / आगर :
पारंपरिक पिकांना फाटा देत आगर परिसरातील शेतकरी वन शेतीकडे वळत असल्याचे चित्र आहे. या भागातील जवळपास २५-३० शेतकऱ्यांनी बांबूची लागवड केली असून, यापासून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे.
शेतकऱ्यांना एकरकमी रक्कम देणारी उडीद, मूग, ज्वारी आदी पिके पावसाच्या लहरीपणामुळे बाद झाल्यानंतर कापूस, सोयाबीन पिकाला शेतकऱ्यांनी पसंती दिली. परंतु यंदाही वन्य प्राण्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
ही पिके वाचविण्यासाठी रात्र जागून काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. यावर उपाय म्हणून कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या शेतकरी हिताच्या विविध योजनांमध्ये शेतकरी सहभागी होऊन लाभ घेत आहेत.
शेतकऱ्यांना ठरणार फायदेशीरआगर परिसरातील शेतकऱ्यांनी शासकीय योजनेत सहभागी होत बांबूची लागवड केली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना हे पीक फायदेशीर ठरणार आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी प्रथमच बांबूची लागवड केल्याचे सांगितले जाते.
शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना जाहीर केल्या आहेत. तेव्हापासून शेतकरी यामध्ये सहभागी होऊन लाभ घेत आहेत. बांबू लागवड हा त्यातीलच एक भाग आहे. - रेणुका टाके, कृषी सहायक, आगर
शेतकरी बांबू शेतीकडे वळत आहेत. २५-३० शेतकऱ्यांना बांबूची रोपे वाटप केली आहे. - पंजाब शिरसाट, रोजगार सेवक, आगर
दरवर्षी पावसाच्या लहरीपणामुळे खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होते. पिकाला लावलेला खर्चही निघाला नाही. कृषी विभागाच्या वतीने सुरू असलेल्या बांबू लागवडीसाठी नाव नोंदणी केली होती. आता बांबूची रोपे मिळाली असून, लागवड सुरू आहे. - दिनेश शिरसाट, शेतकरी, आगर