बांबू शेती करण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याचबरोबर विविध योजनाही सरकारने लागू केल्या आहेत. बांबू उत्पादन करत असताना बांबूची टिकवण क्षमता खूप महत्त्वाची असते. बांबूवर प्रक्रिया केल्यानंतर बांबू जवळपास २० वर्षापर्यंत टिकवता येऊ शकतो हे अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही. पण असे प्रयोगही अनेक शेतकऱ्यांनी केलेले आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील भोर, वेल्हे तालुका कोकणातील काही भाग आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर बांबूचे उत्पादन घेतले जाते. पण शेतकऱ्यांना बाजारपेठ आणि बांबूर होणाऱ्या प्रक्रिया उद्योगासंदर्भात माहिती असणे गरजेचे आहे. सध्या बाजारपेठेत अपरिपक्व बांबू जात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला कमी दर मिळतो. तर बाजारभावानुसार बांबूची साठवण करून ठेवणे गरजेचे असते.
बांबूची तोडणी केल्यानंतर खालच्या बाजूच्या पोकळ भागातून आत मध्ये किडी किंवा वाळवी प्रवेश करून बांबू पोखरला जाऊ शकतो. तर बांबू वर केमिकल ट्रीटमेंट केल्यावर बांबू जवळपास पंधरा ते वीस वर्षांपर्यंत टिकू शकतो. केमिकल ट्रीटमेंट न करता बांबू तोडून ठेवला तर सहा ते आठ महिने तो टिकू शकतो किंवा जास्तीत जास्त वर्षभरापर्यंत तो खराब होत नाही.
केमिकल ट्रीटमेंट केल्यानंतर बांबू मधील क्रोमियम नावाचा घटक वाळवीला बांबू पोखरण्यापासून रोखतो. तर ट्रीटमेंट केल्यानंतर या बांबूचे ऊन आणि पावसापासून या बांबूचे संरक्षण करणे गरजेचे असते.
केमिकल ट्रीटमेंट केल्यास किती मिळतो दर? तोडणी करून थेट बांबू विक्री केलास एका फुटाला पाच ते सात रुपये दर मिळतो. परंतु हाच बांबू जर केमिकल ट्रीटमेंट केला तर एका फुटाला २० ते २२ रुपयापर्यंत दर मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होतो.
माहिती संदर्भ - अनुराधा काशिद (बांबू उत्पादक शेतकरी)