सोलापूर: नॅशनल थर्मल पॉवर कॉपोरेशन (एनटीपीसी) यांना ऊर्जा निर्मितीसाठी लागणाऱ्या दगडी कोळशाच्या ऐवजी शेतकऱ्यांनी बांबू उपलब्ध करून दिल्यास तो विकत घेण्यास तयार असल्याची घोषणा एनटीपीसीचे चेअरमन गुरूदीप सिंह यांनी केली.
फताटेवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथील एनटीपीसीच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम एनटीपीसीचे क्षेत्रीय कार्यकारी संचालक कमलेश सोनी, सोलापूरचे मुख्य महाव्यवस्थापक तपनकुमार बंदोपाध्याय, अपेडाचे सल्लागार डॉ. परशराम पाटील हे उपस्थित होते.
महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशनचे (मित्रा) मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी हे ऑनलाईन उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी कॉनबँक संस्थेचे संजीव करपे यांनी बांबू लागवड कशी करावी, यासाठी कोणती काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन केले.
सोलापूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी राज्य सरकारच्या बांबू योजनेबद्दल माहिती दिली.
पटेल यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
पाशा पटेल म्हणाले, अनेक वर्षांपासूनचे आम्ही पाहिलेले स्वप्न आज सत्यात उतरत आहे. याबद्दल एनटीपीसीचे चेअरमन गुरुदीप सिंह यांचे आभार. बांबू लागवडीसाठी प्रति हेक्टर सात लाख रुपयांचे शासनाने अनुदान दिले आहे. लावलेला बांबू विकायचा कुठे हा शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता, एनटीपीसीने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील बांबू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. आपण दिलेल्या पत्रानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चेअरमन गुरुदीप सिंह यांना पत्र लिहून बायोमासवर सोलापूर एनटीपीसी प्रकल्प चालविल्यास राज्य सरकार मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर सिंग यांनी सोलापुरात येऊन ही घोषणा केली. यावेळी सीईओ जंगम यांचे भाषण झाले.
एकत्रित लागवड आवश्यक : परदेशी
प्रवीणसिंह परदेशी म्हणाले, आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना बांबू लावण्यास प्रवृत्त करणार आहोत. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बांबू लावल्यास त्याची विक्री करता येणे सोपे जाईल. शेतकऱ्यांना इतर पिकापेक्षा अधिक भाव मिळू शकेल.