नंदुरबार जिल्ह्यात नोव्हेंबर ते मार्च महिन्यादरम्यान होणारे स्थलांतर रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात असून, आता त्यात बांबू मिशनची भर पडणार आहे.
जिल्हा परिषदेतर्फे रोजगार हमी योजनेंतर्गत ही योजना राबविली जाणार असून, त्यासाठी सातपुड्यातील विशेषतः अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील हजारो कुटुंबांना सहभागी करून घेतले जाणार आहे. त्याचा आराखडा तयार करण्यात येत असून, येत्या वर्षांपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
सातपुड्यातील जमीन ही डोंगर उताराची आणि भुसभुसीत तसेच झाडांची मुळे धरून ठेवणारी आहे. बांबू लागवडीसाठी या प्रकारची जमीन ही सर्वोत्तम मानली जाते.
त्याच अनुषंगाने सातपुड्यात बांबूचे जंगल निर्माण करण्यासाठी व त्यानुषंगाने हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाची सोय करण्यासाठी आता शासनातर्फे बांबू मिशन राबविले जाणार आहे.
यापूर्वी हे मिशन राबविले गेले, तरी त्याला मर्यादा होती. आता त्याला रोजगार हमी योजनेची सांगड घातली जाणार असून, त्यातून लागवड आणि रोजगार दोन्ही साध्य केले जाणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांनी याबाबतचा आराखडा तयार करून तो शासनाकडे पाठविला आहे. त्यानुसार यंदापासून त्याची अंमलबजावणी शक्य आहे.
यापूर्वीही झाले प्रयोग...
• जिल्ह्यात बांबू लागवडीचे यापूर्वीही प्रयोग झाले आहेत. अनेक कुटूंबांना मोफत रोपे वाटप करण्यात आली होती. काही कुटूंबांनी त्यांचे चांगले संगोपन केल्याने आता त्यापासून त्यांना उत्पन्न मिळत आहे.
• उत्पन्न मिळण्यासाठी अडीच ते तीन वर्षांची वाट पहावी लागत असली तरी एकदाचे उत्पन्न सुरू झाल्यावर मात्र त्यात सातत्य असते. बांबूला स्थानिक बाजारपेठही उपलब्ध आहे.
पहिल्या वर्षी किमान १२ हजार हेक्टरचे उद्दिष्ट...
• बांबू मिशनच्या या उपक्रमाअंतर्गत पहिल्या वर्षी किमान १२ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. पावसाळ्याआधी हे काम पुर्ण करण्यात येणार आहे.
• किमान दोन हेक्टर शेतजमिन नावावर असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यांना बांबूची रोपे मोफत दिली जातील. परंतु त्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी संमती देणे आवश्यक होणार आहे. तरच पुढील प्रक्रिया व लाभत्यांना दिला जाईल.
• रोजगार हमी योजनेअंतर्गत या कुटूंबांना जॉब कार्ड दिले जाईल. एका घरातील दोन कुटुंबांना रोजगार हमी योजनेत सामावले जाईल. ३०० रुपये रोज अर्थात नऊ हजार रुपये महिना मिळेल. दोन व्यक्त असल्यास घरात १८ हजार रुपये महिना येईल. बांबू लागवड व पैसेही येतील. परिणामी स्थलांतर थांबण्यास मदत होईल.
• तीन वर्ष सातत्याने देखभाल व संगोपन केल्यानंतर त्यातून येणारे उत्पन्न हे त्या कुटूंबाचे असेल. अर्थात कायमस्वरूपी रोजगार किंवा उत्पन्नाचे साधन या कुटूंबाचे असेल. यासाठी मात्र सातत्य असणे आवश्यक राहणार असून सरकारी यंत्रणा देखील किती आणि कशी राबते त्यावरही बरेच काही अवलंबून राहणार असल्याने योजनेकडे लक्ष लागून आहे.
सातपुड्यातील शेतकरी कुटुंबांना आता रोजगार आणि उत्पन्न याची सांगड घालून बांबू मिशन राबविले जाणार आहे. यंदा १२ हजार हेक्टरचे उद्दिष्ट आहे. बांबूची चांगल्या प्रजातीची रोपे अशा कुटुंबांना मोफत उपलब्ध करून दिली जातील. - सावनकुमार, सीईओ, जिल्हा परिषद, नंदुरबार.
हेही वाचा : आरोग्यदायी स्ट्रॉबेरी वाढविणार रोगप्रतिकारशक्ती; वाचा गुणकारी फायदे