राजेश मडावी
बांबू लागवड (Bamboo) मूल्यवर्धनासंबंधी सरकारी योजनांवर मोठी चर्चा होत असली, तरी संशोधनाच्या (Research) पातळीवर विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचे प्रयोग मर्यादित राहिले आहेत.
या पार्श्वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नागपूर कृषी महाविद्यालयातील एमएससी (कृषी) अभ्यासक्रमाच्या सहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन लाख रुपयांची फेलोशिप (Fellowship) जाहीर झाली आहे.
एकूण १८ लाख रुपयांचे हे अनुदान त्यांना संशोधनासाठी मिळणार आहे. संशोधन (Research) पूर्ण केल्यानंतर हे विद्यार्थी चंद्रपुरातील बांबू संशोधन (Bamboo Research) व प्रशिक्षण केंद्रात (बीआरटीसी) सादरीकरण करणार आहेत.
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात भरपूर बांबू आढळतो. मात्र, बांबूचा उपयोग पारंपरिक वस्तु निर्मितीच्या पलीकडे होत नव्हता. बांबूच्या वस्तूंना मोठी मागणी असताना स्थानिक कारागिरांना प्रशिक्षणाची सुविधा नव्हती.
ग्रामीण आर्थिक उत्पादनालाही फारसा लाभ नाही. ही उणीव लक्षात घेऊन तत्कालीन वनमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने मूल मार्गावरील चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र सुरू झाले. पण, प्रशिक्षणार्थ्यांची संख्या व व्याप्ती अद्याप वाढलेली नाही.
कृषी विद्यापीठाचा गौरव
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, डॉ. एस. एस. माने, सहयोगी अधिष्ठाता डॉ. विलास अतकरे यांच्या मार्गदर्शनात राज्यात पहिल्यांदाच कृषी विद्यार्थ्यांना ही फेलोशिप (Bamboo Research) जाहीर झाली. हा विद्यापीठाचा गौरव आहे, या शब्दात नागपूर कृषी महाविद्यालयातील कृषी वनशेती प्रमुख डॉ. विजय इलोरकर यांनी आनंद व्यक्त केला.
संशोधनाचे लक्ष्य
बांबू उत्पादकता, लागवड तंत्रज्ञान, कार्बन क्रेडिट, कीडरोग नियंत्रण, कापणीअंती बांबूचा टिकवण कालावधी वाढविण्यासाठी सेंद्रिय प्रक्रिया याबाबत अभ्यास केला जाईल.
बांबूपासून जनावरांसाठी चारा, पारंपरिक बांबू कारागिरांना प्रोत्साहन व अडचणींवरील उपाययोजना, अशा विविध पैलूंवर विद्यार्थी संशोधन करतील. फेलोशिपसाठी पात्र चौघे विद्यार्थी वनशेती विभागाचे तर दोघे अन्य विद्याशाखेत शिक्षण घेत आहेत.
५० टक्के रक्कम थेट विद्यार्थ्यांना
तीन लाख रुपयांपैकी ५० टक्के रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. उर्वरित ५० टक्के रक्कम ही विद्यापीठाच्या वनशेती विभागाला देण्यात येईल.
हा निधी संशोधन संसाधने, पूरक साहित्य व अभ्यास दौरा व तत्सम बाबींसाठी उपयोगात आणला जाईल.