नासीर कबीरकरमाळा : केळी म्हटले की जळगावचे नाव घेतले जायचे. परंतु, आता सोलापूर जिल्ह्यात निर्यातक्षम केळीची लागवड होत आहे. चांगला दर्जा असल्याने सोलापुरी केळीला अरब देशात मागणी वाढली आहे.
सोलापुरी जिल्ह्यातून अरब देशात दररोज ५० ट्रक (एक ट्रक १० टन) केळी बॉक्स पॅकिंग करून निर्यात केली जात आहे. यातून शेतकऱ्यांची तब्बल ३ हजार कोटी रुपयांची उलाढाल होत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, पंढरपूर, माळशिरस या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात केळीची लागवड वाढली आहे. साधारणपणे २७ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये केळीची लागवड झालेली आहे.
सर्वाधिक केळीची लागवड करमाळा तालुक्यात ११ हजार हेक्टर क्षेत्रावर आहे तर त्याखालोखाल माढा तालुक्यात ८ लाख हेक्टर क्षेत्रावर आहे.
पंढरपूर ५ हजार हेक्टर, माळशिरस ३ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड होत आहे. सोलापुरातील केळी इराण, इराक, अरब अमिरात, अफगाणिस्तान या देशांत मोठ्या प्रमाणात निर्यात केली जात आहेत.
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावलेजिल्ह्यातील करमाळा तालुक्यात गेल्या दहा-बारा वर्षांपासून केळीची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. येथील केळीला मागणी असल्याने शेतकऱ्यांना भावही चांगला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे, असे करमाळा तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी सांगितले.
करमाळा तालुक्यातील केळीला गोडवा असल्याने अरब देशात ग्राहकांच्या पसंतीला उतरली. त्यामुळे सोलापुरी केळी निर्यात होत आहेत. निर्यात केलेल्या केळीला चांगला दर मिळत आहे. - धुळाभाऊ कोकरे शेतकरी, कुगाव (ता. करमाळा)
सोलापूर जिल्ह्यात केळीचे उत्पादन अधिक होत आहे. त्यामुळे येथे केळी संशोधन केंद्र उभारावे. शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने केळी लागवडीसोबत बाजारपेठ उपलब्ध करता येईल. - राजेंद्र बारकुंड शेतकरी, चिखलठाण (ता. करमाळा)