Join us

केळी बागांना आधी अवकाळीचा अन् आता वाढत्या तापमानाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2024 10:24 AM

शेतकऱ्यांचे पुन्हा होतेय नुकसान

पंधरवड्यापासून वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा फटका हळदीसह आंबा, केळी बागांना मोठ्या प्रमाणात बसला असताना आता वाढत्या तापमानाचा परिणाम केळी बागांवर होत असल्याने शेतकरी धास्तावला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील जवळा पांचाळ भागात सध्या तापमान ४० अंशापार गेले आहे. त्यामुळे सकाळी ९ वाजेपासूनच उन्हाची प्रखरता जाणवत असून, याचा परिणाम उन्हाळी पिकांवर होऊ लागला आहे. सध्या शेतात उन्हाळी भुईमूग, सोयाबीनसह भाजीपाला आहे. या पिकांचे वाढत्या तापमानामुळे नुकसान होत आहे. तर केळीच्या बागांनाही या रखरखत्या उन्हाचा फटका बसत आहे.

कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ, रेडगाव, वडगाव, वसफळ, गुंडलवाडी, डोंगरकडा परिसरात केळी पिकाला सर्वात जास्त महत्त्व दिले जात आहे. यावर्षी केळी पिकाला चांगलाच दर मिळाला होता. यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केळी पिकाची लागवड केली. यावर्षी मागणी वाढल्याने केळीच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी समाधानी आहे. परंतु, तापमानात कमालीची वाढ झाल्याने केळीला फटका बसत आहे.

पंधरवड्यापासून ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, वादळी वारे यामुळे उन्हाळी शेती पिकांचे नुकसान झाले. आणि आता वाढत्या तापमानाने शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे.

पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

■ वादळी वारा, अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर आता वाढत्या तापमानाने शेतकऱ्यांपुढे नवे संकट राहिले आहेत. रखरखत्या उन्हात दुपारच्या वेळी पिके माना टाकत असून, याचा परिणाम केळीच्या बागांवरही होत आहे.

■ त्यामुळे शेतकरी उपाय योजना करीत आहेत. काही शेतकऱ्यांकडून शेताच्या चहू बाजूने साड्या, मेनकापड, नेट बांधून सावली करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, उन्हाची प्रखरता पाहता त्याचा काही उपयोग होत नसल्याचे पाहावयास मिळत आहे.

वीजप्रश्नामुळे पिकांना पाणी देता येईना

सध्या प्रखर ऊन तापत असून, अशा वातावरणात पिकांना एक ते दोन दिवसांआड पाणी देणे आवश्यक आहे. परंतु, वीजपुरवठा सुरळीत राहत नसल्याने पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. त्यामुळे बागांसह भाजीपाला, उन्हाळी पिके धोक्यात आली आहेत.

केळीच्या घडाचे वजन घटले

कळमनुरी तालुक्यात जवळा पांचाळसह परिसरात सध्या केळीचे घड कापणीस आले आहेत. परंतु, मागील महिन्याभरापासून वाढत्या तापमानाचा परिणाम केळीवर झाला असून, घडाचे वजन घटल्याचे उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा - निंबोळी अर्काच्या वापरामुळे वाचतो २५ टक्क्याहून अधिक कीटकनाशकांचा खर्च

टॅग्स :उष्माघातपाऊसकेळीशेतीशेतकरीबाजार