Join us

केळीचे दर वाढले, उत्पादनात दोन महिन्याचा खंड पडण्याची ही पहिलीच वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 3:00 PM

केळी पीकावर करपा रोगाचा प्रादूर्भाव, शेतकऱ्यांनी काय कराव्या उपाययोजना?

जळगाव जिल्ह्यात ऑक्टोबर ते जानेवारीदरम्यानच्या लागवडीखालील केळीबागा उपलब्ध नसल्याने गत दीड- दोन महिन्यांपासून केळी उत्पादनात खंड पडला आहे. रावेर तालुक्याच्या इतिहासातील हा दुर्मीळ काळ असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. रावेर व ब-हाणपूर केळी बाजारपेठेत २ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल असा तेजीचा भाव असला तरी, केळी उपलब्धत नसल्याने उत्पादक शेतकऱ्यांना हा जणू कोरडाच दिलासा ठरत आहे.

रावेर तालुक्यातील जुनारी व पिलबागांचा हंगाम आटोपला आहे. रब्बीच्या पेरणीसाठी किरकोळ मालाची कापणी वगळता रावेर तथा बहाणपूर येथील केळी बाजारपेठेत गत दीड-दोन महिन्यांपासून केळी उत्पादनात खंड पडला आहे. आपल्याकडील केळीचे बाजारभाव जास्त तेजीत असल्याने सोलापूर जिल्ह्यातील निर्यातक्षम व गुणात्मक दर्जाची केळी यापेक्षा कमी दरात उपलब्ध होत असल्याने निर्यातदार व्यापारी इकडे फिरकूनही पाहायलातयार नाहीत. सोलापूरखेरीज आंध्र प्रदेशात केळी मालाची उपलब्धता असून, रावेरचे आगार मात्र केळी उत्पादनाअभावी सुने आहे. ऑक्टोबर ते जानेवारीदरम्यानच्या रामबाग लागवड शेतकऱ्यांनी चक्राकार पद्धतीने केल्या नसल्याने सद्यपरिस्थितीत कापणीवर बागा नसल्याची शोकांतिका आहे.

आसमानी संकटामुळे खंड यावर्षी मे महिन्याच्या अखेरीस व जूनच्या पूर्वार्धात वादळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्यात हजारो हेक्टर केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्याने सद्य:स्थितीत कापणीवर येणारा केळीमाल मातीमोल झाला आहे. एव्हाना, जामनेर तालुक्यातील कांदेबागाही मे-जूनमधील गारपिटीच्या तडाख्यात झोडपला गेल्याने केळी उत्पादनात मोठी घट निर्माण झाली आहे.

केळीमालाची अनुपलब्धता तसेच मोठी मागणी असलेल्या कालावधीचे निरीक्षण करून केळी उत्पादक शेतकऱ्यांनी स्वतःच्या अनुभूतीने चक्राकार पद्धतीने लागवड करणे आवश्यक आहे. -डी. के. महाजन, प्रगतिशील शेतकरी, वाघोदा बुद्रुक, ता. रावेर, जळगाव

केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव

- केळी पिकावर करपा रोगाने आक्रमण केले आहे. त्यामुळे केळी उत्पादक मोठ्या संकटात सापडले आहे. करपा रोगामुळे पिकांची वाढ खुंटते तसेच घड देखील उशिराने तयार होतात.

- केळी लागवडीसाठी झालेला खर्च, खतांच्या वाढलेल्या किमती, मजुरी या कारणामुळे शेतकरी आधीच हतबल झाला आहे. करपामुळे केळीची पुरेशी वाढ होत नाही. आणि उत्पादनावर मोठा परिणाम होतो. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.

हवामान बदलानेही मोठे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत केळी पिकवणे कठीण झाले आहे. केळी वरील करपा रोगाचा पीक विमा मध्ये समावेश करण्यात यावा, त्यामुळे केळी उत्पादकांना दिलासा मिळू शकेल. - शरद महाजन, चेअरमन, जे. टी. महाजन, फ्रुट सेल सोसायटी, न्हावी.

- केळी बागेची सामुदायिक स्वच्छता करावी, रोगाचा प्रादुर्भाव दिसताच बुरशी नाशकाची फवारणी करावी, ७ ते २१ दिवसांच्या अंतराने रोगाच्या तीव्रतेनुसार चार फवारणी कराव्यात.

- कंद प्रक्रियेपासून पीक व्यवस्थापन केले तर आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते.

टॅग्स :केळीजळगावपीक व्यवस्थापनशेतकरी