Banana Storage :
शरीराला ऊर्जा देणारी केळी आता 'एसी' एअर कंडिशनरच्या थंडाव्यात गोड होत आहेत, हे वाचल्यावर तुम्हाला थोडे वावगे वाटले असेल; पण हे खरे आहे.
आता केळीही 'एसी'चा गारवा खाल्ल्याशिवाय पिकत नाहीत. होय, या प्रकारे पिकविलेली केळी रोज एक टनापेक्षा अधिक शहरात विकली जात आहे.
श्रावणात सर्वाधिक खाल्ली जातात केळी
श्रावणात उपवास करणाऱ्यांची संख्या वाढते. या काळात केळी सर्वाधिक विकली जातात. त्यानंतर रमजान महिन्यातही विकली जातात. मात्र, केळी कार्बाइडने पिकविली जात असल्याने मध्यंतरी अनेकांनी केळी खाणे सोडले होते; पण आता रायपनिंग चेंबरमध्ये पिकविली जाऊ लागल्याने केळ्यांना नैसर्गिक गोडी पुन्हा प्राप्त झाली आहे.
रोज १.२५ लाख डझन केळी पिकतात
दररोज सुमारे सव्वा लाख डझन केळी ३४ रायपनिंग चेंबरमध्ये पिकविली जातात. श्रावण महिन्यामध्ये सर्वाधिक केळी विकली जातात.
रायपनिंग चेंबरचे फायदे
• इथिलीनसारख्या नैसर्गिक संप्रेरकाचा (नॅचरल हॉर्मोन) वापर करून केळी गरजेनुसार पिकविली जातात.
• केळीतील गर, साल, एकसंघपणे पिकत असल्यामुळे फळाचा टिकाऊपणा वाढतो.
• फळांच्या वजनामध्ये 3 कमीत कमी घट आणि फळांची गोडी, चव व आकर्षकपणा वाढतो.
काय आहे नवीन टेक्निक?
• चेंबरमध्ये प्लास्टिक क्रेटमध्ये केळी ठेवली जातात.
• क्रेट एकावर एक रचले जाते.
• रायपनिंग चेंबरमध्ये इथिलीन सिलिंडरचा वापर केला जातो.
• ०.००५ टक्के ते ०.०१ टक्क्यांदरम्यान इथिलीन वायू चेंबरमध्ये सोडल्या जातो.
• एक दिवस ठेवल्यानंतर त्या शीतगृहामध्ये आणल्या जातात.
• शीतगृहात १८ ते २१ डिग्री अंश सेल्सिअस आणि ८५ ते ९० टक्के सापेक्ष आर्द्रता राखली जाते.
• पाच दिवस थंडगार वातावरणात राहून केळी पिकतात.
• सहाव्या दिवशी या पिकलेल्या केळी बाजारात विकायला येतात.
जुनी पध्दत
पूर्वी केळी भट्टीत पिकविली जात होती. नंतर एका रात्रीतून श्रीमंत होण्याच्या मानसिकतेतून
कार्बाइडचा वापर करून केळी पिकविली जाऊ लागली. याचे घातक परिणाम दिसून येऊ लागले. यामुळे कार्बाइडने केळी व अन्य फळे पिकविण्यावर सरकारने बंदी आणली आहे. आता त्याऐवजी वैज्ञानिकदृष्ट्या रायपनिंग चेंबरमध्ये केळी पिकविली जात आहे.
केळी रायपनिंग चेंबर किती ?
शहरात रायपनिंग चेंबर, कोल्डस्टोअरेजमध्ये अशा पद्धतीने केळी पिकल्या जात आहे. आजघडीला शहरात ३४ केळी रायपनिंग चेंबर आहेत. एकट्या बायजीपुऱ्यात ६ चेंबर, याशिवाय शहागंज, किराडपुरा, पैठणगेट, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, पुंडलिकनगर, चिकलठाणा हिनानगर आदी भागांत ही चेंबर आहेत.
- इम्रान बागवान, मालक, रायपनिंग चेंबर