जुन्नर तालुक्यातील अनेक युवा शेतकरी नवनवीन प्रयोग करून आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे पिक घेऊन भरघोस उत्पन्न घेत आहेत नुकतेच जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागातील कोपरे गावाच्या काठेवाडीतील रमेश बांगर या शेतकऱ्याने स्ट्रॉबेरीचे यशस्वी पीक घेऊन अनेकांची मने जिंकली आहेत आता उदापूर येथील युवा शेतकरी संपत ज्ञानेश्वर शिंदे यांनी देखील बारटोक जातीचे भरता वांग्याचे भरघोस उत्पन्न घेऊन किमया साधली आहे.
उदापूर येथील शेतकरी संपत शिंदे व त्यांची अर्धागिनी निशा शिंदे या नवरा बायकोने एकमेकांच्या साथीने ५० गुंठे शेतीमध्ये साडे चार फुटांवर बेड पद्धत करून ठिबक सिंचन केले व चार हजार रोपांची अडीच फुटांवर लागवड केली सध्या १८ ते २० रुपये प्रति किलो बाजारभाव मिळत असून मागणीप्रमाणे काही माल मॉलला देत आहे.
अधिक वाचा: पीएम किसान योजनेंतर्गत अनुदानासाठी 'लँड सिडिंग' कसे करावे?
मजुरीला फाटा दिला अन् कष्टाचा फायदा झाला
सतत वाढणारी मजुरी व बदलणारे हवामान यामुळे शेतकरी आधीच मेटाकुटीला आला असल्यामुळे तसेच कमी भांडवल असल्यामुळे या नवरा बायकोनेच स्वतः वावरात कष्ट करण्याचा निर्णय घेतला आणि मजुरीला फाटा दिला प्रामाणिकपणे कष्ट केल्यावर त्याचे चीज नक्कीच होते याची अनुभूती त्यांना आली सध्या वांग्याच्या झाडाला भरपूर फळधारणा झाल्यामुळे उत्पन्न देखील चांगले निघत आहे हे वांगे बारटोक जातीचे भरता वांगी म्हणून प्रसिद्ध असून काळसर निळा कलर उभ्या लांब आकाराचे फळे आहेत याचे वजन देखील चांगले भरत आहे.