सर्वात चांगला तांदूळ म्हणून बासमतीची ओळख आहे. यावर्षी राजस्थान, पश्चिम बंगालमध्ये बासमती तांदळाचे उत्पादन कमी आहे. यामुळे बासमती तांदळाचे दर १३० रुपये किलोवरून १५० रुपयांवर पोहोचले आहेत. याचाच परिणाम तांदूळ विक्रीवर होऊन मागणीत प्रचंड घट झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दरम्यान हॉटेल चालकांनीदेखील एक प्लेट बासमती राईसची किमत १३० हून १४५ रुपये केली आहे. यामुळे चांगल्या पगारदारांनीच बासमती खायचा का? असा प्रश्न जनसामान्यांकडून उपस्थित होत आहे.
बासमती तांदळाचे दर २० टक्क्याने वाढले
यावर्षी तांदळाच्या उत्पन्नात घट झाल्यामुळे १५ ते २० टक्क्याने बासमती तांदळाच्या दरात वाढ झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान यामुळे बासमती तांदळाच्या मागणीत घट होऊन कालीमुंछ तांदळाची विक्री वाढली आहे. कालीमुंछ तांदळासाठी केवळ ५० रुपये मोजावे लागत आहेत. तर बासमती तांदूळ १२० रुपयांपासून १५० रुपयांवर पोहोचला आहे.
कोणत्या तांदळाला किती दर ? (प्रतिकिलो)
कोलम ५५ ते ६०
बासमती - १२० ते १५०
कालीपुंछ - ५० ते ५५
इंद्रायणी - ४० ते ४५
अंबा मोर ७० ते ७५
काय आहे कारण?
जुन्या तांदळाचा साठा संपला असून यावर्षी अद्याप नवीन बासमती बाजारात दाखल झालेला नाही. तसेच पावसाचे प्रमाण कमी असल्याने पश्चिम बंगाल, राज्यस्थान, केरळ या राज्यातील बासमती तांदळाचे उत्पादन कमी झाली आहे. राज्यातदेखील इंद्रायणी व कोलम या तांदळाचे उत्पादन होते. मात्र पावसाचे प्रमाण कमी असल्याने राज्यातील उत्पादनातही घट झाली आहे. दरम्यान, बासमती दीडशे रुपये किलो झाल्याने कालीपुंछ व कोलम या तांदळाला मागणी वाढली आहे. हे तांदूळ ५० ते ५५ रुपये किलोने शहरात विक्री होत आहेत.
नवीन बासमती तांदूळ अद्याप बाजारात उपलब्ध झालेला नाही. यावर्षी राज्यासह देशभर पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे विविध राज्यातून उत्पादित होणारा बासमती तांदूळ यावर्षी घटला आहे. यामुळे बासमती तांदळाचे दर वाढले आहेत. -मीत शहा, व्यापारी, बीड