Join us

Bibtya attack in Maharashtra : बिबट्यांचे हल्ले रोखणार उपाययोजनांसाठी ४.५ कोटी खर्चाला मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 3:56 PM

वर्षभरात जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यात ७ जणांचे मृत्यू झाले असून सुमारे ६ हजार पाळीव प्राण्यांचा बळी गेला आहे.

पुणे : वर्षभरात जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यात ७ जणांचे मृत्यू झाले असून सुमारे ६ हजार पाळीव प्राण्यांचा बळी गेला आहे. त्यामुळे पुढील काळात जीवितहानी टाळण्यासाठी तात्पुरत्या दीर्घकालीन व उपाययोजना राबविण्यात येणार असून त्यासाठी जुन्नर वनविभागाला सविस्तर प्रस्ताव देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

यात बिबट्यांच्या नसबंदीसह निवारण केंद्राची क्षमता वाढ करणे तसेच त्यांची अन्य अधिवासांत रवानगी असे उपाय करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा नियोजन समिती व आपत्ती व्यवस्थापन निधीतून साडेचार कोटींचा निधी वापरणार आहे.

प्रांताधिकाऱ्यांकडून दर आठवड्याला आढावा घेणार असल्याची माहिती दिवसे यांनी दिली. याबाबत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. त्यात दिवसे यांनी याबाबत संबंधितांना निर्देश दिले. जुन्नर तालुक्यातील हल्ल्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बिबट्यांच्या पार्श्वभूमीवर जुलैमध्ये हा तालुका आपत्तीप्रवण म्हणून घोषित केला आहे.

जीवितहानी कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्यात येत असून पिंजरे लावणे, मोठ्या क्षमतेचे दिवे लावणे, आपदामित्रांनी प्रशिक्षण देणे, मेंढपाळांना तंबू देणे, त्यात टॉर्च व बल्बची व्यवस्था करणे, सौर कुंपणाची व्यवस्था करणे तसेच बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कृत्रिम प्रज्ञा अर्थात एआयचा वापर करणे अशा तात्पुरत्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.

यापूर्वीच ९७ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून सुमारे साडेचार कोटींचा निधी जिल्हा नियोजन समिती व आपत्ती व्यवस्थापनातून देण्यात येणार असल्याची माहिती दिवसे यांनी यावेळी दिली.

बिबट्यांच्या प्रजननावर नियंत्रण- दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये बिबट्यांच्या प्रजननावर नियंत्रण आणण्यासाठी नसबंदी, मनुष्यांवर हल्ले करणाऱ्या बिबट्यांचा पकडून त्यांना दूरवरच्या अधिवासात सोडण्याची व्यवस्था निर्माण करणे तसेच माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रात बिबट्यांच्या क्षमतेत वाढ करण्याचा प्रस्ताव आहे.- यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक आहे. दिवसे यांनी याबाबत जुन्नर वनविभागाला येत्या दोन दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.- हा प्रस्ताव आल्यानंतर तो राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राकडे पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.- या केंद्राची मान्यता वर्ग १ असून ते वर्ग २ मध्ये रुपांतरित करण्याचाही प्रस्ताव देण्यात येणार आहे.- वर्ग १ असल्याने सध्या या केंद्राबाबतच्या निर्णयासाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागते. वर्ग २ झाल्यानंतर स्थानिक पातळीवर निर्णय घेता येणे शक्य असल्याचे ते म्हणाले.

जुन्नर तालुका आपत्तीप्रवण म्हणून घोषित केल्यानंतर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत अनेक विभागांना समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार आता जुन्नरच्या प्रांताधिकाऱ्यांना या उपाययोजनांचा दर आठवड्याला आढावा घेण्यात येणार आहे. बिबट्यांच्या हल्ल्यांचे हॉटस्पॉट ठरवून त्याचे जीआयएस मॅपिंग करण्यात येणार आहे. त्यानुसार उपाययोजना करण्याचे वनविभागाला निर्देश देण्यात आले आहेत. - डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी

टॅग्स :बिबट्याजुन्नरजिल्हाधिकारीपुणेवनविभागजंगलआर्टिफिशिअल इंटेलिजन्स