सोशल मीडियावर जाहिरात पाहून त्यावर संपर्क करायचा, कांदा, बटाटे, टोमॅटो ऑनलाइन मागवायचे. त्यांना नंतर ऑनलाइन पैसे टाकतो म्हणत सातारा जिल्ह्यातील भामट्याने बीडच्या व्यापाऱ्याला सव्वा दोन लाख रुपयांना गंडा घातला. सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करत या भामट्याचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या.
ओंकार संजय दनाने (वय २१, रा. पाडेगाव फार्म, ता. फलटण, जि. सातारा) असे पकडलेल्या भामट्याचे नाव आहे. गणेश रामराव पोपळे (रा. संत नामदेवनगर, बीड) हे बटाट्याचे व्यापारी असून त्यांचे कोल्ड स्टोरेज आहे. त्यांनी फेसबुकवर बटाटे विक्री असल्याची जाहिरात जून २०२३ रोजी टाकली होती. यावर ओंकारने संपर्क करत ऑर्डर दिली.
पोपळे यांनीही सातारा येथे १२ टन ७० किलो बटाटे पाठविले; परंतु पैसे ऑनलाइन टाकतो, असे म्हणत त्याने पोपळे यांना भुलवत ठेवले. अखेर समोरचा पैसे देत नसल्याने पोपळे यांनी सायबर पोलिस ठाणे गाठत ९ फेब्रुवारीला गुन्हा दाखल केला होता. सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास केला. ऑकार हा सातारा जिल्ह्यात असल्याची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक निशिगंधा खुळे यांचे पथक साताऱ्यात पोहोचले.
स्थानिक पोलिसांची मदत घेत त्याला भल्या पहाटेच बेड्या ठोकल्या. त्याला बीडमध्ये आणल्यावर न्यायालयात हजर केले. १३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. त्याच्याकडून रक्कम वसुलीची कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक देवीदास गात, उपनिरीक्षक निशिगंधा खुळे, गणेश घोलप, दत्तात्रय मस्के, रामदास गिरी, सुनीता शिंदे आदींनी केली.शेतीपूरक हा जोडधंदा करेल मालामाल; वराह पालनात मोठ्या संधी
चार जिल्ह्यांतील व्यापाऱ्यांना गंडा
ओकार हा १२ वी पास आहे; परंतु सोशल मीडियावर कयम सक्रिय असतो. फेसबुकसह इतर माध्यमांवर कांदा, टोमॅटो, बटाटा यांच्या जाहिराती पाहून तो व्यापाऱ्यांना संपर्क साधतो. माल मागवून घेतल्यानंतर ऑनलाइन पैसे पाठवतो, असा विश्वास देतोः परंतु त्याने आतापर्यंत कोणालाही पैसे दिले नाहीत. बीडसह सातारा, पुणे आणि अहमदनगरच्या व्यापाऱ्यांना त्याने गंडा घातल्याचे उघड झाले आहे. या आगोदर त्याच्यावर सातारा जिल्ह्यातच एक अशाच प्रकारचा फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे, तसेच एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार केल्याचा गुन्हाही त्याच्यावर दाखल आहे.
बटाटे विकून केली ऐश
ओंकारला दारू पिण्याची सवय आहे. त्याने केवळ ऐश करण्यासाठीच हे गुन्हे केले आहेत. फसवणूक करून आणलेले बटाटे, कांदे विक्री करून त्याने ऐश केली आहे.