पुणे: कांदा चाळीच्या धर्तीवर द्राक्षापासून तयार करण्यात येणाऱ्या बेदाण्याच्या साठवणुकीसाठी बेदाणा चाळीला शेतकऱ्यांना १० लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे फलोत्पादक संचालक डॉ. कैलास मोते यांनी केली.
ते शनिवारी पुण्यात आयोजित महाराष्ट्र राज्य बागाईतदार संघाच्या द्राक्ष परिषदेत बोलत होते. तीन दिवसीय ही परिषद वाकड येथील एका हॉटेलमध्ये शनिवारी (दि.२३) सुरू झाली असून त्याचे उद्घाटन डॉ. मोते यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते बागाईतदारांना संबोधित करत होते.
या कार्यक्रमास राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. कौशिक बॅनर्जी, राष्ट्रीय संघाचे अध्यक्ष सोपान कांचन, कर्नाटक संघाचे अध्यक्ष कृष्णा रेड्डी, महाराष्ट्र संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार, उपाध्यक्ष कैलास भोसले खजिनदार सुनील पवार, चंद्रकात लांडगे व पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे देखील परिषदेला येणार होते, परंतु ते उपस्थित राहू शकले नाहीत. तर संपूर्ण राज्यातून शेकडोच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
कांदा चाळीच्या धर्तीवर बेदाणा चाळीला अनुदानाच्या कक्षेत आणण्याची द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची मागणी होत होती. त्याबाबत घोषणा करताना डॉ. मोते म्हणाले की, बेदाणे चाळ उभारण्यासाठी राज्य सरकारकडून द्राक्ष बागाईतदारांना एकूण १० लाखांचे अनुदान (सबसिडी) मध्ये मशीन आणि बांधकाम असे दोन प्रकार असतील.
तसेच, राज्यातील द्राक्षाचा दर्जा अधिक चांगला करून आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीयस्तरावर देशाअंतर्गत बाजारपेठ वाढविण्यासाठी गरज आहे, असेही ते म्हणाले.
उत्पादनाचा दर्जा सुधारण्यासाठी स्वतंत्र कौन्सिलची स्थापना- फळांच्या उत्पादनाचा दर्जा अधिक सुधारण्यासाठी स्वतंत्र कॉन्सिलची स्थापना करण्यात आली आहे.- ते कॉन्सिल फळाचा उच्च दर्जा, बाजारपेठ, आदींबाबत मार्गदर्शन करणार आहे. द्राक्ष उत्पादन खर्चिक आहे. त्यासाठी ३ लाख ८० हजारांचा विमा कवच आहे. त्यांचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.- डॉ. कौशिक बॅनर्जी यांनी केंद्रांच्या सोशल मीडियावर द्राक्ष वाणाबाबत तज्ज्ञांचे मार्ग दर्शनही केले जात आहे असे सांगत त्याला शेतकऱ्याचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.- नवीन संशोधन, वाणाचा दर्जा, नवीन तंत्रज्ञान यांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमात आरोहन या डिजिटल मार्केटिंग अॅपचे अनावरण करण्यात आले.- तसेच, द्राक्ष वृत्त व द्राक्ष संहिता पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. खजिनदार सुनील पवार यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी आभार मानले.