Beed Bailgada Sharyat : मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्ये काल भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बीड शहरालगत असलेल्या तळेगाव शिवारात या शर्यतींचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण राज्यभरातील विविध बैलगाडे या शर्यतीमध्ये सहभागी झाले होते. तीनशे मीटर लांब असलेल्या धावपट्टीवर बैलगाडा पळवले गेले.
दरम्यान, मराठवाड्यातील परभणी, नांदेड, हिंगोली हा भाग वगळला तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये बैलगाडा शर्यतींचे प्रमाण नगण्य आहे. तर बीड जिल्ह्यांमध्ये तीन ते चार ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जाते. राजकीय मंडळी मोठा खर्च करून बैलगाडा शर्यतीचे काही दिवसांपासून आयोजन करत आहेत. काल झालेल्या बैलगाडा शर्यतीसुद्धा राजकीय मंडळींनी आयोजित केलेल्या होत्या.
या शर्यतीसाठी बैलगाडा शर्यतीमध्ये पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले बकासूर, सोन्या, हरण्या, सर्जा अशा नामांकित बैल सामील झाले होते. तर ही शर्यत जिंकणाऱ्या बैलगाडीला मराठवाडा केसरी हा किताब दिला गेला. पुणे जिल्ह्यातील नामांकित बकासूर बैलाने ही शर्यती जिंकली असून मराठवाडा केसरी आणि ट्रॅक्टरचा मान मिळवला आहे. या शर्यतीसाठी शर्यतशौकिनांची मोठी गर्दी झाली होती.
पश्चिम महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींची क्रेझ आहे. त्याचबरोबर शर्यतीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागांतील अर्थकारणाला चालना मिळाली आहे. त्याप्रमाणे आता सगळीकडेच बैलगाडा शर्यतीचे क्रेझ वाढू लागली आहे. तर राजकीय मंडळींचा सहभाग वाढू लागल्यामुळे बक्षिसांची रक्कम वाढू लागली आहे. यामुळे प्रेक्षक आणि सहभाग घेणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.
खऱ्या अर्थाने बैलगाडा शर्यतींमुळे खिल्लार गोवंश संवर्धनासाठी चालना मिळाली असं म्हणता येईल. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातल्यानंतर खिल्लार बैलांचे आणि गायींचे दर खाली आले होते. शर्यती सुरू झाल्यानंतर पुन्हा दर पटीने वाढले असून शेतकरी आणि या अर्थव्यवस्थेतील इतर घटकांना मोठा फायदा झाला.