महिनाभर पाठपुराव्यानंतर प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेत बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. दोन्ही जिल्ह्यातील मुर्तिकारांसह, वीणकाम करणारे तसेच पारंपरिक कौशल्य व्यवसाय करणाऱ्या कामगारांना या योजनेअंतर्गत लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या समावेशाने बीड जिल्हा लोहार - गाडीलोहार समाज विकास संघटनेने केलेल्या प्रयत्नांना यश आले असून या घटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
भारतातील पारंपरिक कौशल्य असणाऱ्या व्यावसायिकांना आर्थिक पाठबळ तसेच अद्यावत प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान विश्वकर्मा योजना कार्यान्वित केली होती. परंतु बीड व संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश या योजनेत झालेला नव्हता. त्यामुळे बीड जिल्हा लोहार - गाडी लोहार समाज विकास संघटनेने ही बाब जिल्हाधिकारी, शासन व लोकप्रतिनिधी तसेच पंतप्रधान कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. तसेच पंतप्रधान विश्वकर्मा योजनेमध्ये बीड व छत्रपती संभाजीनगरचा समावेश करण्याची मागणी निवेदनात केली होती.
या प्रयत्नांना अखेर यश आले असून बीड व संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्यांचा समावेश पंतप्रधान विश्वकर्मा योजनेत करण्यात आला. शनिवारी सतीश डोंगरे यांचा पंतप्रधान विश्वकर्मा योजनेमध्ये बीड जिल्ह्यातून पहिला अर्ज दाखल केला आहे. ज्या अठरा घटकांचा यामध्ये समावेश केलेला आहे. या सर्व समाजामध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. पाठपुरावा करून मिळालेल्या यशाबद्दल संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चंद्रकांत आणेराव व संघटनेचे सचिव व पदाधिकाऱ्यांचा सर्व समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
वाचा सविस्तर- पंतप्रधान विश्वकर्मा योजना: हातांवर पोट असणाऱ्या कारागिरांना मिळणार विनातारण कर्जया घटकांना घेता येणार योजनेचा लाभ
- सुतार, लोहार, चर्मकार, कुंभार, सोनार, नाभिक, फुलारी, धोबी, शिंपी, मिस्तरी, अस्त्राकार, बोट बांधणारे, अवजारे बनवणारे, खेळणी बनवणारे, जावी बनवणारे, मासेमारीचे जाळे विणणारे, बास्केट, झाडू, चटाया विणणारे, मूर्तिकार अशा जवळपास १८ वेगवेगळ्या घटकातील पारंपरिक कौशल्य व्यवसाय करणाऱ्या कारागिरांना या योजनेचा लाभ होणार आहे.
- त्यांना मास्टर ट्रेनर प्रशिक्षण देणार असून पाचशे रुपयांचा स्टायफंडही मिळणार आहे.
- तसेच पंधरा हजार रुपयांचे टूलकिट या योजनेतून दिले जाणार आहे. तीन लाखांपर्यंतचे कर्जही शासनाच्या माध्यमातून या कारागिरांना मिळणार आहे.