Join us

खतसाठ्याच्या माहितीसाठी कृषीमंत्र्यांच्या बीडची डिजिटल आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 4:47 PM

बीड जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी कार्यालयाचा उपक्रम. अद्ययावत ब्लॉगद्वारे शेतकऱ्यांना मिळते खतांची माहिती.

खतांच्या साठ्याबाबत सर्वसामान्य शेतकऱ्यांना तत्काळ माहिती उपलब्ध होऊन त्याची गैरसोय होऊ नये यासाठी बीडच्या कृषी अधीक्षक कार्यालयाने स्वतंत्र ब्लॉग केला असून त्याला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत साडेसहा हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी खतसाठ्याच्या माहितीसाठी या ब्लॉगला भेट दिली आहे. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यात हा पारदर्शक उपक्रम सुरू असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

जुलैच्या शेवटी राज्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडल्याने पेरण्यांना वेग आला, तर काही ठिकाणी पेरण्या आटोपल्या. ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या पावसाअभावी खोळंबल्या होत्या, त्यांनी खतांची खरेदीही लांबणीवर टाकली होती. मात्र पेरण्या होताच खतांची मागणी वाढल्याने अनेक ठिकाणी खतांच्या कमतरतेच्या बातम्या येऊ लागल्या. त्याच दरम्यान राज्याच्या विधिमंडळातही खत आणि बियाणांचा प्रश्न चर्चेला आला होता. खतांच्या साठ्याबद्दल शेतकऱ्यांना माहिती व्हावी यासाठी लवकरच एक डॅशबोर्ड (संकेतस्थळ) करणार असल्याची घोषणाही राज्य शासनाच्या वतीने सभागृहात करण्यात आली. असे असले तरी बीड जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने मागच्या वर्षीच हा ब्लॉगरूपी डॅशबोर्ड तयार केला असून त्याचा लाभही शेतकरी घेत आहेत. 

बीडचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी श्री. बाबासाहेब जेजूरकर यांनी लोकमत ॲग्रोला सांगितले की सन २०२२ मध्ये खत उपलब्धता संबंधी ब्लॉगची आम्ही केली व या सेवेचे उद्घाटन सध्याचे कृषीमंत्री व तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री  धनंजय मुंडे साहेब यांच्या हस्तेच करण्यात आले होते. त्यावर आपण खतांची ग्रेड, तालुका निहाय दुकानदारकडे उपलब्ध खत साठा अशी संपूर्ण माहिती बघू शकतात. सदर ब्लॉग किंवा डॅशबोर्ड हा  खत बियाणे पुरवठा नियंत्रण अधिकारी तथा कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद बीड यांचे कडून वेळोवेळी अपडेट केला जातो.

शेतकऱ्यांना खतांची माहिती पुरविणाऱ्या या ब्लॉगची लिंक https://beedfertilizer.blogspot.com/ अशी आहे. याठिकाणी जिल्ह्यातील खत वितरकांची यादी, पॉस वितरकांची यादी, तालुकानिहाय खतांचा साठा, खतांच्या बॅग अहवाल, ही सर्व माहिती देण्यात आली आहे. याशिवाय मुख्य पानावरच बीड जिल्ह्यातील तालुक्यांची नावे असून त्यावर क्लिक केले की शेतकऱ्यांना आपल्या भागातील कृषी केंद्राची माहिती मिळते. तसेच युरिया, डीएपी, सिंगल सुपर फॉस्फेट कुठे किती उपलब्ध आहे याची माहिती एका क्लिकवर मिळते. संबंधित ब्लॉग मोबाईलवरही सहज पाहता येतो. 

खतांच्या या ब्लॉगवर आम्ही वेळोवेळी माहिती अपडेट करत असताे. त्यामुळे कुठल्या कृषी केंद्रात कुठला खतसाठा आहे, हे शेतकऱ्यांना समजते. त्यामुळे संबंधित दुकानदार खत नाकारू शकत नाही, तसेच खताचा काळाबाजार रोखण्यासाठीही त्याचा उपयोग होतो.

भुजंग खेडकर, कृषी  विकास अधिकारी, जिल्हा परिषद, बीड

 

टॅग्स :खरीपबीडखतेशेती