राज्यात पीक विमा भरण्यात बीड जिल्हा पहिल्या क्रमांकावर असून, १८ लाख ४८ हजार शेतकऱ्यांनी विमा भरत ७ लाख ९१ हजार ४९२ हेक्टरवरील पिके संरक्षित केली. त्यापाठोपाठ नांदेड, अहमदनगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ११ लाखांवर शेतकऱ्यांनी विमा भरला आहे.
राज्य सरकारने यंदा १ रुपया भरून पीक विमा योजना प्रथमच आणली होती. अधिकाधिक शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी होतील, असे अपेक्षित होते; परंतु राज्यातील पाच जिल्हे वगळता इतर २९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी १० लाखांचा आकडाही पार केला नसल्याचे आकडेवारीवरून दिसते. मागच्या वर्षीच्या तुलनेत काही जिल्ह्यात पीक विमा भरणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली आहे, तर कोल्हापूरसारख्या जिल्ह्यात केवळ ५५ हजार ३०७ शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे.
शेवटच्या टप्प्यात झाली नाही वाढ
२५ जुलैनंतर पीक विमा भरताना सर्व्हर डाउन असल्याने अनेकांना अडचणी आल्या होत्या. त्यासंबंधीच्या तक्रारी वाढल्याने ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र, शेवटच्या टप्प्यात फारशी वाढ झाली नसल्याचे विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यातील १ कोटी क्षेत्रावरील पिके संरक्षित
पंतप्रधान पीक विमा योजनेत राज्यातील ३४ जिल्ह्यातील १ कोटी ६९ लाख ४८ हजार ७९० एवढ्या शेतकयांनी सहभाग घेतल्याने १ कोटी १२ लाख ४२ हजार ५६४ हेक्टरवरील पिके संरक्षित झाली आहेत.
जिल्हा | शेतकरी | संरक्षित क्षेत्र |
बीड | १८,४८,८८६ | ७,९१,४९५ |
नगर | ११.७२,१०४ | ६,७६,७२८ |
नांदेड | ११,९७,०३४ | ७,५४,८०९ |
छत्रपती संभाजीनगर | ११,५०,३४४ | ३,५३,३६८ |
जालना | १०,१५,४७४ | ५,१६,७३९ |